गोविंदाचा आज म्हणजेच 21 डिसेंबरला वाढदिवस असून त्याचे वडील अरुण कुमार आहुजा हे अभिनेते होते तर त्याची आई निर्मला देवी या गायिका होत्या. त्याच्या वडिलांनी औरत तसेच आणखी काही चित्रपटात काम केले होते. त्यानंतर त्यांनी एका चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली. मुंबईच्या कार्टर रोडमध्ये राहाणाऱ्या त्याच्या कुटुंबावर विरारमधील चाळीत राहाण्याची वेळ आली. गोविंदाचा जन्म हा विरारमध्येच झाला. त्याला लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीविषयी आकर्षण होते. विरारमध्ये त्याच्या घराच्या समोरच एक छोटेसे थिएटर होते. या थिएटरमध्ये तो दिवसाला दोन चित्रपट तरी पाहात असे. वयाच्या 15 व्या वर्षी तो रोज विरारहून ट्रेनने राजश्री प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये काम मागण्यासाठी जात असे आणि त्याला ते लोक तिथून बाहेर काढत असत. ही गोष्ट त्याची नित्याचीच झाली होती.
अभिनयासोबतच गोविंदाला डान्सची आवड होती. त्यामुळे त्याने सरोज खानच्या अॅकेडमीत डान्स शिकायला सुरुवात केली. तो इतका चांगला डान्स करत होता की, काहीच महिन्यांत इन्स्ट्रक्टर म्हणून त्याची निवड करण्यात आली. इल्जाम या चित्रपटापासून त्याने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने आजवर आँखे, कुली नं 1, साजन चले ससुराल, दिवाना मस्ताना, दुल्हे राजा, बडे मियाँ छोटे मियाँ, हसीना मान जायेगी, शिकारी, जोडी नं 1, क्योंकी में झुठ नही बोलता, अखियों से गोली मारे, पार्टनर यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
गोविंदाला आयुष्यात खूप स्ट्रगल करावा लागला आहे. त्याविषयी त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याची आई आणि तो एकदा ट्रेनने प्रवास करत होते. ट्रेनला इतकी गर्दी होती की, काही केल्या त्याच्या आईला ट्रेनमध्ये चढता येत नव्हते. अशा पाच ते सहा ट्रेन गेल्या, या गोष्टीचे त्याला इतके वाईट वाटले की, त्याने त्याच्या एका काकाकडून पैसे उसने मागितले आणि आईसाठी फर्स्ट क्लासचे तिकीट काढले होते.