Join us

गोविंदाच्या घरात 20 दिवस एक फॅन मोलकरीण म्हणून राहिली, एका मोठ्या मंत्र्याची मुलगी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 12:29 IST

एका तरुणीनं गोविंदाची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घरात मोलकरीण बनून काम केलं होतं.

बॉलिवूडचा 'हिरो नंबर 1' गोविंदा (Govinda)चे जगभरात चाहते आहेत. 1990 च्या काळात गोविंदाची तरुणींमध्ये क्रेझ होती. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रतीक्षा करायचे. गोविंदासाठी अगदी वाट्टेल ते करायची त्यांची तयारी होती. अशीच गोविंदाची एक मोठी फॅन होती. तिने तर मोलकरीण असल्याचं नाटक केलं आणि गोविंदाच्या थेट घरातच एन्ट्री घेतली होती. काय आहे तो किस्सा आपण जाणून घेऊया. 

एका तरुणीनं गोविंदाची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घरात मोलकरीण बनून काम केलं होतं. एक किंवा दोन दिवस नाही तर ती तब्बल 20 ते 22 दिवस गोविंदाच्या घरात मोलकरीण बनून राहिली होती. विशेष म्हणजे ही तरुणीदेखील कोणी साधीसुधी नव्हती. तर ती एका मोठ्या मंत्र्यांची मुलगी होती.  नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाची पत्नी सुनिता यांनी हा किस्सा सांगितला. 

नुकतंच सुनिता यांनी 'टाइमआऊट विथ अंकिता' या पॉडकास्टमध्ये सांगितलं, "गोविंदाची एक चाहती मोलकरीण बनून आमच्या घरात जवळपास 20 ते 22 दिवस राहिली होती. तिच्याकडे पाहून ती श्रीमंत घरातली मुलगी असावी, अशी मला शंका आली. कारण, तिला कुठलेही काम जमत नव्हते. तिला भांडी घासणं आणि साफसफाई करायला जमत नव्हतं. शिवाय, ती गोविंदाची वाट बघत उशिरापर्यंत जागी राहत असे. तेव्हा मी माझ्या सासूजवळ तिच्याबद्दलची शंका बोलून दाखवली".

सुनीता पुढे म्हणाल्या, "आम्ही तिची माहिती काढली असता ती एका मंत्र्याची मुलगी असल्याचं समोर आलं. गोविंदाच्या प्रेमापोटी ती आमच्या घरात मोलकरीण बनून राहत होती. सत्य समोर येताच ती आमच्यासमोर रडू लागली आणि गोविंदाची फॅन असल्याचं तिने कबूल केलं. आम्ही तिच्या वडिलांना कळवलं. तर तिला घेण्यासाठी ते चार गाड्या घेऊन आले आणि तिला घेऊन गेले". 

टॅग्स :गोविंदासेलिब्रिटीबॉलिवूड