Join us  

४ दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिलचेअरवर दिसला अभिनेता, म्हणाला- "माझ्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 1:18 PM

Govinda :बॉलिवूड अभिनेता गोविंदाला मंगळवारी(१ ऑक्टोबर) स्वत:च्याच लायसन्स बंदूकीतून त्याला गोळी लागल्याची घटना घडली. त्यानंतर गोविंदाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर चार दिवसांनी आज गोविंदाला डिस्चार्ज मिळाला आहे. 

बॉलिवूड अभिनेता गोविंदाला मंगळवारी(१ ऑक्टोबर) स्वत:च्याच लायसन्स बंदूकीतून त्याला गोळी लागल्याची घटना घडली. या घटनेत त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर गोविंदाला तातडीने अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून अभिनेत्याच्या पायातील गोळी काढली होती. त्यानंतर काही दिवस गोविंदाला उपचारासाठी रुग्णालयातच ठेवण्यात आलं होतं. अखेर चार दिवसांनी आज गोविंदाला डिस्चार्ज मिळाला आहे. 

रुग्णालयातून बाहेर पडताच गोविंदाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत गोविंदा व्हिलचेअरवर बसलेला दिसत आहे. एएनआयच्या ट्वीटर हँडलवरुन गोविंदाचा रुग्णालयाबाहेरचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर येताच गोविंदाने माध्यमांशी संवाद साधला. "आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानतो", असं म्हणते गोविंदाने चाहत्यांचे आभार मानले.

गोविंदाच्या पायाला ८-१० टाके पडले आहेत. त्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी त्याला पुढचे ३-४ महिने तरी आराम करावा लागणार आहे.आता काही महिने पायावर जास्त वजन टाकता येणार नाही, अशी माहिती डॉक्टर अग्रवाल यांनी दिली आहे. 

या प्रकरणात गोविंदाची पोलिसांनी चौकशीही केली आहे. पण, त्याच्या उत्तराने मात्र पोलीस समाधानी नसल्याचं समोर आलं आहे. रिव्हॉलव्हरचा ट्रिगर गोविंदानेच दाबल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. इतर अनेक प्रश्नांची उत्तरही पोलिसांना मिळालेली नाहीत. ज्याप्रकारे घटना घडली त्यावर पोलिसांना विश्वास बसत नाहीये, त्यामुळे आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा गोविंदाची पोलीस चौकशी करणार आहेत.  

टॅग्स :गोविंदासेलिब्रिटी