Join us

गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 12:43 PM

गोविंदाची या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली आहे. पण, त्याच्या उत्तराने मात्र पोलीस समाधानी नसल्याचं समोर आलं आहे. 

बॉलिवूड अभिनेता गोविंदाला मंगळवारी(१ ऑक्टोबर) स्वत:च्याच लायसन्स बंदूकीतून त्याला गोळी लागल्याची घटना घडली. या घटनेत त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर गोविंदाला तातडीने अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अभिनेत्याच्या पायातील गोळी काढली असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. गोविंदाची या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली आहे. पण, त्याच्या उत्तराने मात्र पोलीस समाधानी नसल्याचं समोर आलं आहे. 

एबीने माझाने दिलेल्या माहितीनुसार,  गोविंदाच्या जबाबावर पोलीस समाधानी नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. रिव्हॉलव्हरचा ट्रिगर गोविंदानेच दाबल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. इतर अनेक प्रश्नांची उत्तरही पोलिसांना मिळालेली नाहीत. ज्याप्रकारे घटना घडली त्यावर पोलिसांना विश्वास बसत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी अनेकदा गोविंदाला प्रश्न विचारले. मात्र घडलेली घटना आणि गोविंदाने दिलेली उत्तरं यामध्ये पोलिसांना तफावत जाणवत आहे. त्यामुळे पोलिसांनी या संपूर्ण घटनेवरच संशय व्यक्त केला असून त्याचा अधिक तपासही पोलीस करत आहेत. रुग्णालयातून गोविंदाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलीस पुन्हा त्याचा जबाब घेऊ शकतात. 

गोविंदाच्या मॅनेजरने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार,  गोविंदा पहाटेच एका कार्यक्रमासाठी कोलकत्याला जाणार होता. तयार होत असताना त्याने त्याची लायसन्स रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवण्यासाठी हातात घेतली. मात्र ती चुकून हातातून खाली पडली. रिव्हॉल्वरचं लॉक खुलं राहिल्याने त्याच्या पायाला गोळी लागली. त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याचे कुटुंबीय रुग्णालयात आहेत. डॉक्टरांनी गोळी काढली असून आता तो सुखरुप आहे, काळजी करण्याचं कारण नाही अशी माहिती समोर आली आहे. सध्या तो रुग्णालयातच उपचार घेत आहे.

गोविंदाला 8-10 टाके पडले असून त्याच्या गुडघ्यापासून खाली गोळी लागली होती. त्यांच्या पायातली बंदुकीची गोळी काढण्यासाठी एक -दीड तास गेला. बुलेट त्यांच्या हाडात अडकली होती. दोन दिवसांत डिश्चार्ज मिळेल. पण पुढचे तीन-चार महिने तरी आराम करावा लागणार आहे. आता काही महिने पायावर जास्त वजन टाकता येणार नाही, अशी माहिती डॉक्टर अग्रवाल यांनी दिली आहे.  

टॅग्स :गोविंदासेलिब्रिटी