अभिनेता गोविंदाला नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 1 ऑक्टोबर रोजी पहाटे गोविंदाच्या पायाला गोळी लागली. त्याच्या परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी सुटली जी त्याच्या पायाला लागली. ही दुर्घटना समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला. गोविंदाला तातडीने अंधेरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी गोळी काढली. मात्र त्या पहाटे नक्की काय घडलं, गोळी कशी सुटली याचा संपूर्ण घटनाक्रम गोविंदाने बाहेर आल्यानंतर सांगितलं आहे.
आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गोविंदाने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्याने सर्व चाहत्यांचे, हितचिंतकांचे आभार मानले. यानंतर त्याला संपूर्ण घटनाक्रम विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, "मी एका शोसाठी घरातून निघत होतो. कोलकत्याला जाणार होतो. पहाटेचे पावणे पाच वाजले होते. (हसतच) माझ्या हातून बंदूक खाली पडली आणि त्यातून गोळी निघाली. मला असं झटका लागल्यासारखं झालं. मी बघितलं की नक्की झालं काय तर धूर निघत होता. या घटनेला आणखी कशाशी जोडलं जाऊ नये म्हणून मी आधी व्हिडिओ तयार केले. नंतर डॉक्टर अग्रवाल यांच्या घरी जाऊन पोहोचलो. त्यांनी मला क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल केलं." Voompla या मनोरंजन पेजवर गोविंदाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
गोविंदाला तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यादरम्यान बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी त्याची भेट घेतली, त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. कश्मिरा शाह, शत्रुघ्न सिन्हा, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी यांनी गोविंदाची भेट घेतली होती. व्हीलचेअरवर बसून गोविंदा रुग्णालयाबाहेर आला तेव्हा त्याने माध्यमांना प्रतिक्रिया देत आपण ठणठणीत असल्याचं सांगितलं.
पोलिसांना होता वेगळाच संशय
गोविंदाला गोळी लागल्याची घटना घडल्यानंतर जुहू पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. तेव्हा त्यांनी घेतलेल्या जबाबात गोविंदाचं स्टेटमेंट सतत बदलत असल्याचं जाणवलं. त्यामुळे पोलिसांना गोविंदावरच संशय होता.