Join us  

गोविंदाच्या पायाला किती टाके पडले? कधी मिळणार डिस्चार्ज ? डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 5:44 PM

गोविंदाच्या डॉक्टरांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदाला स्वत:च्याच लायसन्स बंदूकीतून गोळी लागली आहे. आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रिव्हॉल्वरचे लॉक खुलं असल्याने चुकून गोळी लागली. त्याला तातडीने अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान गोविंदाच्या डॉक्टरांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

गोविंदावर मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार झाले. तिथे त्याच्या पायातून गोळी काढण्यात आली. ज्यांनी गोविंदाच्या पायातली गोळी काढली, ते डॉक्टर अग्रवाल यांनी मीडियाशी बोलताना अभिनेत्याचे हेल्थ अपडेट दिलं. गोविंदाला 48 तासांनंतर डिस्चार्ज देण्यात येईल, असे ते म्हणाले. यासोबतच गोविंदाला किती टाके पडले हेही त्यांनी सांगितले.

डॉक्टर अग्रवाल यांनी सांगितले की, "गोविंदाला 8-10 टाके पडले आहेत. त्याच्या गुडघ्यापासून दोन इंच खाली गोळी लागली होती. गोविंदाला आज पहाटे पाच वाजल्याच्या दरम्यान हॉस्पिलटमध्ये आणण्यात आलं होतं. तर सहा वाजता त्याला ऑपरेशनसाठी घेऊन गेलो. त्यांच्या पायातली बंदुकीची गोळी काढण्यासाठी एक -दीड तास गेला. बुलेट त्यांच्या हाडात अडकली होती. गोविंदाला आठ ते दहा टाके पडले असून त्याला औषधे वेळेवर घ्यावी लागणार आहेत. दोन दिवसांत डिश्चार्ज मिळेल. पण पुढचे तीन-चार महिने तरी आराम करावा लागणार आहे. आता काही महिने पायावर जास्त वजन टाकता येणार नाही".

गोविंदाच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, गोविंदाला कोलकाता येथे एका शोसाठी सकाळी 6 वाजताची  ( मंगळवार 1 ऑक्टोबर) फ्लाइट पकडायची होती. गोविंदा त्यांच्या निवासस्थानातून विमानतळाकडे निघणार होता.  तेव्हा ही दुर्घटना घडली. गोविंदा त्यांची परवाना असलेली रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवत असताना त्यांच्या हातातून रिव्हॉल्व्हर पडली आणि त्यातून गोळी सुटली. रिव्हॉल्व्हरचे लॉक उघडे असल्याने गोळी सुटली. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

टॅग्स :गोविंदासेलिब्रिटीबॉलिवूडआरोग्य