Join us

तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले गोविंदा आणि नीलम, एकेकाळी गोविंदा होता नीलमच्यामागे वेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 1:22 PM

गोविंदा पहिल्याच भेटीत नीलमवर भाळला होता. पुढे तो तिच्यात गुंतत गेला अगदी सुनीताशी लग्न ठरले असतानाही.

ठळक मुद्देगोविंदाच्या वडिलांना नीलम आवडत होती. त्यांचा या लग्नाला विरोध नव्हता. पण गोविंदाच्या आईचा या लग्नाला कडाडून विरोध होता.

गोविंदा आणि नीलमने 10 चित्रपट एकत्र केलेत. यापैकी सहा सिनेमे सुपरहिट झालेत. यादरम्यान गोविंदा नीलमसाठी अक्षरश: वेडा झाला होता. नीलम आणि गोविंदा यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले असले तरी गेल्या 20 वर्षांत त्यांना आपल्याला कोणत्या चित्रपटात एकत्र पाहायला मिळालेले नाही. पण सुपर डान्सर सीझन 4 मध्ये नुकतीच गोविंदा आणि नीलम यांनी हजेरी लावली. 

गोविंदा आणि नीलम यांना अनेक वर्षांनी एकत्र पाहून त्यांचे फॅन्स प्रचंड खूश झाले होते. या कार्यक्रमात ते दोघे थिरकताना देखील दिसले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नीलमचा नवरा अभिनेता समीर सोनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबत तब्बल 20 वर्षांची प्रतीक्षा संपली असे कॅप्शन त्याने लिहिले आहे.

गोविंदा पहिल्याच भेटीत नीलमवर भाळला होता. पुढे तो तिच्यात गुंतत गेला अगदी सुनीताशी लग्न ठरले असतानाही. ११ मार्च १९८७ ला गोविंदाचे लग्न सुनीतासोबत झाले. पण लग्न व्हायच्या काही वर्षआधी गोविंदा नीलमच्या प्रेमात पडला होता. एकीकडे सुनीता आणि दुसरीकडे नीलम अशी त्याची अवस्था झाली होती. त्या काळात नीलमशिवाय गोविंदाच्या मनात दुसरा कुठलाही विचार नव्हता अगदी होणाऱ्या पत्नीसमोर म्हणजेच सुनीतासमोर तो नीलमची प्रशंसा करताना थकत नसे. एवढेच नाही तर तू सुद्धा नीलमसारखी बन, असेही तो सुनीताला सांगायचा. सुनीता यावर प्रचंड चिडायची.

एकदा असेच झाले. पण यावेळी रागाच्या भरात सुनीता नीलमबद्दल असे काही बोलली की, गोविंदा संतापला. कारण गोविंदा नीलमबद्दल एक शब्दही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता. झाले, यावरून त्याचे आणि सुनीताचे कडाक्याचे भांडण झाले. इतके की, गोविंदाने सुनीतासोबतचा साखरपुडाही मोडला. पण एवढे करूनही नीलम गोविंदाची होऊ शकली नाही.

गोविंदाच्या वडिलांना नीलम आवडत होती. त्यांचा या लग्नाला विरोध नव्हता. पण गोविंदाच्या आईचा या लग्नाला कडाडून विरोध होता. कारण गोविंदासाठी सुनीताला पसंत केले होते. आईपुढे गोविंदाचे काहीही चालले नाही. अखेर आईच्या इच्छेखातर गोविंदाने सुनीतासोबत लग्न केले. यानंतर 2011 मध्ये नीलमने समीर सोनीसोबत लग्नगाठ बांधली.

टॅग्स :गोविंदा