८०-९० च्या दशकात आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावणारा अभिनेता गोविंदा. आज गोविंदाचा वाढदिवस. त्याचं पूर्ण नाव गोविंदा अरुण आहुजा आहे हे फार कमी जणांना माहित आहे. गोविंदाचे चित्रपट बघायला थिएटरबाहेर रांग लागायची हेही तितकेच खरे.
एकाच वेळी साईन केले ४० सिनेमे
गोविंदाचे अभिनयावर प्रचंड प्रेम आहे. पहिल्या काही चित्रपटांच्या यशानंतर त्याच्या पुढे सिनेमांची रांग लागली होती. प्रत्येक दिग्दर्शकाला गोविंदासोबत काम करायचे होते. दरम्यान गोविंदाने एक रेकॉर्डही त्याच्या नावे केला. गोविंदाने त्याकाळी तब्बल ४० सिनेमे एकाच वेळी साईन केल्याचा विक्रम केला. इतकंच नाही तर एकूण ७० चित्रपट त्याच्यासमोर तयार होते.
गोविंदा डान्स !
अभिनयासोबतच गोविंदाला डान्सचेही तितकेच वेड होते. गोविंदा डान्स कॉपी करायचा अनेक जण प्रयत्न करतात. अभिनेत्री नीलम, करिष्मा कपूर यांच्याबरोबर गोविंदाची अनेक गाणी गाजली आहेत. नीलम सोबतचे 'आप के आ जाने से' हे हिमालयात शूट झालेले गाणे आजही अनेक ठिकाणी वाजवले जात आहे.
राजा बाबू, कुली नं १, जिस देश मे गंगा रहता है, एक और एक ग्यारह, नसीब अशा अनेक गाजलेल्या सिनेमात गोविंदाने काम केले आहे. सध्या गोविंदा खूप कमी सिनेमात दिसतो मात्र त्याने गाजवलेला काल आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे.