गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये एक प्रकरण चांगलंच चर्चेत होतं. ते प्रकरण म्हणजे सुपरस्टार गोविंदा(govinda) आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा (sunita ahuja) यांचा घटस्फोट. सुनिताने लग्नाच्या ३७ वर्षांनंतर गोविंदाला घटस्फोटाची नोटिस पाठवली असल्याचं म्हटलं गेलं. पण या सर्व अफवा असल्याचं सिद्ध झालं. गोविंदा-सुनिता वेगळे होणार नाहीत, यावर शिक्कामोर्तब झाला. कारण या सर्व चर्चांवर गोविंदाची पत्नी सुनिता अहूजा यांनी पहिल्यांदाच त्यांचं मत व्यक्त केलं.
गोविंदाची पत्नी घटस्फोटांच्या चर्चांवर काय म्हणाली?
सोशल मीडियावील बजी मूवी या पेजने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत सुनिता माध्यमांना मुलाखती देताना दिसत आहेत. त्या म्हणाल्या की, "आम्ही दोघे वेगवेगळे राहतो कारण गोविंदा राजकारणातही सक्रीय आहे. जेव्हा गोविंदाला राजकारणात सहभागी व्हायचं होतं तेव्हा घरी सतत कार्यकर्ते यायचे. त्या काळात आमची मुलगी तारुण्यात प्रवेश करत होती. तरुण मुलगी आणि मी घरी असायचो. अशावेळेस कार्यकर्ते असताना घरी शॉर्ट्समध्ये वावरणं आमच्यासाठी बरोबर नव्हतं. म्हणून आम्ही समोर ऑफिस घेतलं. मला गोविंदापासून कोणी वेगळं करु शकत नाही. आम्हाला वेगळं करणारा कोणी व्यक्ती असेल त्याने समोर यावं."
अशा शब्दात गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा यांनी त्यांचं परखड मत व्यक्त केलं. या वक्तव्यावरुन गोविंदा आणि सुनिताच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये काही तथ्य नव्हतं हे स्पष्ट झालंय. गोविंदा आणि सुनिताने मार्च १९८७ साली लग्न केलं. या दोघांना टीना ही मुलगी आणि यशवर्धन हा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा-सुनितामध्ये मतभेद होतो त्यामुळे दोघे घटस्फोटाचा निर्णय घेणार असल्याची बातमी पसरली. पण सुनिताने दिलेल्या या स्टेटमेंटमुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय.