अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम' सिनेमा माहित नाही अशी व्यक्ती आढळणंं दुर्मिळ गोष्ट. आजही दर रविवारी हा सिनेमा कोणत्यातरी टीव्ही चॅनलवर प्रसारित केला जातो. २५ वर्ष झाली तरीही 'सूर्यवंशम' सिनेमा आवडीने पाहणारे लोकं आहेत. भानू प्रताप आणि त्याला दिलेली खीर.. या गोष्टी म्हणजे 'सूर्यवंशम' सिनेमातील आजही चर्चेतला विषय. सिनेमातील भानू प्रताप यांचा नातू अर्थात सोनू सध्या काय करतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आनंद वर्धन या कलाकाराने 'सूर्यवंशम' या चित्रपटात ठाकूर भानू प्रताप सिंग यांचा नातू आणि ठाकूर हीरा सिंग यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. आनंद वर्धन यांचे आजोबा यांचा सिनेसृष्टीशी घनिष्ट संबंध आहे. शिवाय आनंद वर्धन यांचे वडील पीबी श्रीनिवास हे सुप्रसिद्ध गायक होते. आजोबा आणि वडिलांमुळे आनंदच्या घरी सतत सिनेसृष्टीतील दिग्गजांचा वावर असायचा.
'सूर्यवंशम चित्रपटाशी संबंधी एक माणूस आनंदचे बाबा पीबी श्रीनिवास यांना भेटायला घरी आला. तेव्हा लहान आनंदचा गोंडसपणा त्यांना आवडला आणि त्याने त्याला चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर दिली. त्यामुळे वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी आनंदने चित्रपटात काम करायला सुरुवात केली. बालकलाकार म्हणून त्याने जवळपास 25 चित्रपटांमध्ये काम केले. इतकंच नव्हे त्याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा 'नंदी' पुरस्कारही मिळाला. आनंदने 'सूर्यवंशम' सिनेमात साकारलेली भूमिका आजही सर्वांच्या आवडीची आहे.
बालकलाकार म्हणून करिअर शिखरावर असताना आनंदने अचानक चित्रपटांमधून ब्रेक घेतला. अभिनय सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणं त्याला गरजेचं होतं. पुढे आनंदने कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर आनंदने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. लवकरच तो एका तेलगू चित्रपटातही मुख्य अभिनेता म्हणून दिसणार असल्याची बातमी आहे.