पडद्यावर ‘बॅड मॅन’ अशी प्रतिमा तयार होऊनही ख-या आयुष्यात तो ‘गुड मॅन’ असलेले अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांच्या ‘बॅड मॅन’ या आत्मचरित्राचे प्रकाशन नुकतेच झाले. गुलशन ग्रोव्हर यांचा अख्खा जीवनप्रवास या पुस्तकात रेखाटण्यात आला आहे. चारशेहून अधिक चित्रपट आणि बहुतांश चित्रपटांमध्ये साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका साकारणारे गुलशन ग्रोव्हर यांनी चित्रपटसृष्टीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. पण इथपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. एकेकाळी या अभिनेत्याने घर चालवण्यासाठी डिटर्जंट पाऊडर, फिनाईलच्या गोळ्या विकल्या.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत गुलशन ग्रोव्हर यांनी आपल्या गरीबीच्या दिवसांच्या अनेक आठवणी सांगितले. ‘मी माझ्या आयुष्यात अनेक चढऊतार पाहिलेत. माझे लहानपण अतिशय गरीबीत गेले. मला आजही आठवते, माझी शाळा दुपारची असायची. पिशवीत शाळेचा गणवेष टाकून मी भल्या पहाटे घरून निघायचो आणि घरोघरी डिटर्जंट पाऊडर विकायचो. शाळेचा खर्च भागवण्यासाठी मी फिनाईलच्या गोळ्याही विकल्या. पण मी गरीबीला कधीच घाबरलो नाही. याचे कारण म्हणजे माझे वडील.
त्यांनी आम्हाला कष्ट आणि प्रामाणिकपणा शिकवला. त्या दिवसांत खायलाही पैसे नसायचे. अनेक दिवस भुकेल्या पोटी राहावे लागायचे. कॉलेजला जाईपर्यंत हीच स्थिती होती. पुढे अॅक्टिंगसाठी मी मुंबईत आलो. त्या काळातही अनेकदा उपशापोटी झोपलो. आजचा दिवस कसा काढू, कुठे जाऊ, असा प्रश्न मला रोज पडायचा. पण मी हिंमत हरली नाही. प्रयत्न करत राहिलो. त्याचे फळ आज तुमच्यासमोर आहे,’ असे त्यांनी सांगितले.
गुलशन ग्रोव्हर यांनी आजवर ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘रॉकी’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पाहता पाहता ते बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.