नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यात भारताने दोन पुरस्कारांवर नाव कोरलं. आरआरआर सिनेमातील नाटू नाटू या गाण्याने ऑस्कर पटकावला. शिवाय द एलिफंट व्हिस्परर्स या लघुपटानेही ऑस्करवर नाव कोरलं. द एलिफंट व्हिस्परर्स (The Elephant Whisperers) या लघुपटाने डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म या कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्कार जिंकला. या माहितीपटाची निर्मिती गुनीत मोंगानं (Guneet Monga) केली आहे. तर दिग्दर्शन कार्तिक गोन्साल्विसने केलं आहे. शुक्रवारी गुनीत ऑस्करची ट्रॉफी घेऊन भारतात परतली तेव्हा मुंबई विमानतळावर तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी ती सुखावली. पण यावेळी एक खंत तिने बोलून दाखवली. होय, ऑस्कर जिंकल्यानंतर गुनीतला भाषण देण्याची संधी मिळाली नाही. याबद्दल तिने नाराजी बोलून दाखवली.
एका मुलाखतीत गुनीत यावर बोलली. ती म्हणाली, ऑस्कर जिंकल्याचा आनंद आहे. पण एका गोष्टीमुळे मी निराश आहे. ऑस्करच्या मंचावर मला भाषण करता आलं नाही. खंर तर मला याचा बाऊ करायचा नव्हता. पण वाईट वाटलं. हा भारताचा क्षण होता आणि माझ्याकडून तो हिसकावून घेतला गेला. ऑस्करच्या मंचावर मला भाषणाची संधी मिळाली नाही. मात्र ऑस्करच्या प्रेस रूममध्ये मला ती संधी मिळाली. तिथे मी मोकळेपणानं आपलं म्हणणं मांडलं. पुढच्यावेळी ऑस्कर मिळेल तेव्हा मी माझं भाषण नक्की देईल, अशी मी शपथ घेतली आहे.
गुनीत मोंगा व दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस ऑस्कर जिंकल्यानंतर मंचावर आपलं भाषण देण्यासाठी गेल्या होत्या. कार्तिकीला भाषणाची संधी मिळाली. मात्र गुनीतच्या वेळी म्युझिक वाजायला लागलं आणि तिला भाषण न देताच मंचावरून खाली खावं लागलं होतं. यानंतर बेस्ट एनिमेटेड शॉर्ट फिल्मच्या ऑस्करची घोषणा झाली. त्यांच्या दोन्ही विजेत्यांना मात्र भाषणाची संधी दिली गेली होती. अनेकांनी गुनीत मोंगा यांच्यासोबत दुजाभाव झाल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त केली होती.