‘मिस्टर इंडिया’ या सिनेमातील हा चिमुकला कदाचित तुमच्या विस्मरणात गेला असावा. पण आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. अर्थात आता तो चिमुकला बॉलिवूडचा हिरो झाला आहे. अनिल कपूरच्या ‘मिस्टर इंडिया’मधून बालकलाकार म्हणून एन्ट्री करणारा आणि पुढे ‘पागलपन’ आणि ‘ये दिल आशिकाना’ मधून लीड हिरो म्हणून दिसलेल्या या हिरोचे नाव आहे करण नाथ.
करण नाथ गेल्या 10 वर्षांपासून रूपेरी पडद्यावरून गायब झाला होता. आता तब्बल दशकभरानंतर करण पुन्हा कमबॅक करतोय. ‘गन्स ऑफ बनारस’ हा त्याचा सिनेमा येत्या 20 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय.
2001 मध्ये ‘पागलपन’ या चित्रपटातून करण नाथने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण हा पहिला चित्रपट करणला म्हणावी तशी ओळख देऊ शकला नाही. दुस-याच वर्षी ‘ये दिल आशिकाना’ हा त्याचा सिनेमा रिलीज झाला. हा चित्रपट सुपरहिट झाला. चित्रपटाची गाणी प्रचंड गाजलीत. या चित्रपटाने करण एका रात्रीत स्टार झाला. या चित्रपटानंतर बॉलिवूडला एक नवा सुपरस्टार मिळाल्याचे अनेकांना वाटले. पण हा गैरसमज होता. कारण यानंतर करणचा एकही चित्रपट कमाल दाखवू शकला नाही. त्याच्या वाट्याला एकही बिग बजेट चित्रपट आला नाही. तुम ए डेंजर्स, एलओसी कारगील, तेरा क्या होगा जॉनी, जबरदस्त अशा लहान बजेटच्या चित्रपटात तो दिसला. पण नंतर त्याला भूमिका मिळणेही बंद झाले आणि करण बॉलिवूडमधून गायब झाला.
पण आता करण ‘गन्स ऑफ बनारस’ या सिनेमातून कमबॅक करतोय. तेही तब्बल 11 वर्षानंतर. या आगामी सिनेमात करण गुड्डू शुक्लाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. हा सिनेमा अभिनेता धनुषच्या Polladhavan या सुपरहिट साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. शेखर सुरीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात नतालिया कौर, अभिमन्यू सिंग, तेज सप्रू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
करण नाथ हा निर्माता राकेश नाथ यांचा मुलगा आहे. कधी काळी राकेश नाथ माधुरी दीक्षितचे पर्सनल सेक्रेटरी होते. 28 वर्षे त्यांनी माधुरीसोबत काम केले आणि यानंतर निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.