अभिनेता गुरमीत चौधरी जे.पी. दत्ता यांच्या 'पलटन' चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याने एका आर्मी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने त्याचे वडील मेजर सिताराम चौधरी यांच्याकडून धडे घेतले आहेत.
याबाबत गुरमीत म्हणाला की, 'माझ्या वडीलांनी कित्येक वर्ष सैन्य व मातृभूमीची सेवा केली आहे. ते जवानांना प्रशिक्षण द्यायचे. त्यामुळे जेव्हा पलटन चित्रपटातील माझ्या भूमिकेसाठी ट्रेनिंग घ्यायचे ठरले. ते प्रशिक्षणासाठी योग्य व्यक्ती आहेत असे डोक्यात आले. चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी प्रशिक्षण घेणे आव्हानात्मक होते.' जे.पी. दत्ता यांनी मला 'पलटन' चित्रपटात काम करण्याची संधी दिल्यामुळे त्यांचा आभारी असल्याचे गुरमीतने सांगितले व पुढे म्हणाला की,' आर्मी अधिकाऱ्याची भूमिका साकारण्यासाठी वडीलांकडून ट्रेनिंग घेण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने त्यांच्याशी खूप छान वेळ व्यतित करायला मिळाला. त्यामुळे मी खूप खूश आहे. तसेच या चित्रपटात बरेच कलाकार असून त्यांच्यासोबत काम करायला खूप मजा आली.'दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांनी तब्बल बारा वर्षांनंतर 'पलटन' सिनेमातून पुनरागमन केले आहे. ते बॉर्डर, एलओसी कारगिल आणि रिफ्युजी यासारख्या सीमेवरील युद्धाच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. 'पलटन' चित्रपट 1967 साली भारत व चीनमध्ये झालेल्या युद्धावर आधारीत आहे. या सिनेमाचे चित्रीकरण लेह, लदाख व चंदीगढमध्ये पार पडले आहे. या चित्रपटात गुरमीत व्यतिरिक्त अर्जुन रामपाल, सोनू सूद, सिद्धांत कपूर, मोनिका गिल व सोनल चौहान प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या चित्रपटातून छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दीपिका कक्कर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.