दिग्दर्शक प्रशांत वर्माने आपल्या पहिल्या ओरिजनल सुपरहिरो चित्रपटाची घोषणा केलीये. या चित्रपटाचं नाव आहे, ‘हनुमान’. नुकताच ‘हनुमान’चा (Hanuman) टीझर रिलीज झाला आणि या टीझरने चाहत्यांना क्रेझी केलं. टीझरमधील व्हीएफएक्सचं सोशल मीडियावर जबरदस्त कौतुक झालं. इतकं की, क्षणात या टीझरची तुलना ‘आदिपुरूष’च्या टीझरशी केली गेली.
या तेलगू सिनेमात अभिनेता तेजा सज्जा (Teja Sajja) ‘हनुमान’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. आता हा तेजा सज्जा कोण? हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल. तर आज आम्ही त्याच्याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
तेजा सज्जा हा तेलगू फिल्म इंडस्ट्रीचा स्टार आहे. 1998 साली तेजाने बालकलाकार म्हणून फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. 2019 साली त्याने लीड हिरो म्हणून करिअर सुरू केलं. त्याचा पहिला सिनेमा होता, ‘ओह बेबी’. तेजाला तेलगू इंडस्ट्रीत येऊन उणीपुरी तीन वर्षे झालीत. पण तीनच वर्षांत त्याने सर्वांना वेड लावलं आहे. 2021 साली त्याचा ‘जॉम्बी रेड्डी’ हा सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमानं धम्माल केली. बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं तुफान कमाई केली.
हैदराबादेत जन्मलेला तेजा सज्जा सध्या तेलंगणात राहतो. लवकरच तो ‘हनुमान’ बनून सुपरहिरो चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटासाठी तेजाने प्रचंड मेहनत केली. गेल्या वर्षभरापासून या सिनेमाचं शूटींग सुरू आहे आणि तेजाची मेहनत स्पष्ट दिसतेय. ‘हनुमान’च्या टीझरमध्ये तेजाची बॉडी लँग्वेज जबरदस्त आहे. टीझरमधील त्याचे भेदक डोळे, त्याचे अॅक्शन सीक्वेन्स पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल.
‘हनुमान’ हा सिनेमा भारतीय पौराणिक कथांमधील महत्वाच्या पात्रांवर आधारित आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये संस्कृत श्लोकांचं बॅकग्राऊंड म्युझिक देण्यात आलं आहे ज्यामुळे चित्रपटातील व्हीएफएक्सला आणखीनच वजन प्राप्त झालं आहे. चित्रपटाची कथा ‘हनुमान’च्या व्यक्तिरेखेची आहे, जो रामाच्या भक्तीत तल्लीन आहे आणि जो सर्वशक्तीमान दाखवण्यात आला आहे. हा टीझर पाहून लोकांनी त्याची तुलना प्रभास आणि सैफ स्टारर ‘आदिपुरुष’च्या टीझरशी केली आहे.
ट्विटर युजर्स ‘हनुमान’च्या व्हीएफएक्सचं जोरदार कौतुक करत आहेत. ‘हनुमान’चा बजेट 12 कोटी आहे तर ‘आदिपुरूष’चा बजेट 600 कोटी आहे,अशी तुलना करत ‘आदिपुरूष’ला ट्रोल केलं जात आहे.
प्रशांत वर्मा दिग्दर्शित ‘हनुमान’मध्ये तेजा सज्जा, अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तेलगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.