अभिनेत्री ग्रेसी सिंह हिचा आज (२० जुलै) वाढदिवस. २० जुलै १९८० रोजी दिल्लीत ग्रेसीचा जन्म झाला. ग्रेसीचे वडिल स्वर्ण सिंह एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत आणि आई वरजिंदर कौर शिक्षक होती. ग्रेसीने डॉक्टर वा इंजिनिअर बनावे, अशी तिच्या पालकांची इच्छा होती़ पण ग्र्रेसीला मॉडेलिंगमध्ये रस होता.तुम्हाला माहित नसेल पण चित्रपटांत येण्याआधी ग्रेसीने काही मालिकांमध्ये काम केले. झी टीव्हीवरील ‘अमानत’मध्ये तिने घरून पळून जाणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती.
२००१ मध्ये ग्रेसीला आमिर खानच्या अपोझिट ब्रेक मिळाला. ‘लगान’ या गाजलेल्या चित्रपटात ग्रेसी लीड रोलमध्ये दिसली. या चित्रपटाला आॅस्करच्या विदेशी भाषा श्रेणीत नॉमिनेशन मिळाले होते. ‘लगान’चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना चित्रपटात एका भोळ्या-भाबळ्या मुलीचा शोध होता. ग्रेसी या भूमिकेसाठी अगदी योग्य होती.
२००३ मध्ये अजय देवगणसोबत ‘गंगाजल’मध्ये तिची वर्णी लागली. पण यात तिची भूमिका फार मोठी नव्हती. याचवर्षी अनिल कपूर आणि प्रीति झिंटासेबत ‘अरमान’ या चित्रपटात ग्रेसीला संधी मिळाली.२००४ मध्ये ग्रेसी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या सुपरडुपर हिट चित्रपटातही दिसली.
पण यानंतर ग्रेसीच्या फिल्मी करिअरला उतरती कळा लागली. यानंतर काही बी आणि सी ग्रेडच्या चित्रपटांत काम करण्याची वेळ तिच्यावर आली. पण इथेही ग्रेसी टीकली नाही. मग तिने पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला. ‘जय संतोषी मां’ या मालिकेत ती टायटल रोलमध्ये दिसली.
टीव्हीवर काम करत असतानाचं तिने २००९ मध्ये डान्स अॅकेडमी सुरु केली. गेल्या काही वर्षांत ग्रेसी बरीच बदलली आहे. या वर्षांत अध्यात्माकडे तिचा ओढा वाढला. यानंतर ग्लॅमरपासून ती पूर्णपणे दूर गेली आणि तिने ब्रह्मकुमारी ज्वॉईन केली. माझा स्वत:साठी काहीही प्लान नाही़ घरचे लोक मला लग्नासाठी आग्रह करतात. पण मी अद्याप याबद्दल काहीही विचार केलेला नाही, असे ती एका मुलाखतीत म्हणाली होती.