बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये मोडणारं एक नाव म्हणजे नसीरुद्दीन शाह. आपला स्पष्टवक्तेपणा आणि परखड व्यक्तिमत्वासाठी नसीर ओळखले जातात. समांतर चित्रपटांसाठी ओळखले जाणाऱ्या नसीर यांच्या भूमिका अगदी निवडक असतात. या निवडक भूमिकांचा अभ्यास करून त्या ते पडद्यावर अजरामर करतात. 1980मध्ये आलेल्या 'हम पांच' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर 'मंथन', 'मिर्चमसाला', 'भवनी भवाई', 'अलबर्ट पिन्टो को गुस्सा क्यों आता है', 'उमराव जान', 'जाने भी दो यारों' यांसारख्या चित्रपटांच्या माध्यामांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपल अढळ स्थान निर्माण केलं आहे. काही दिवसांपूर्वीच नसीरुद्दीन शाह यांचे आत्मचरित्र प्रकाशित झालं. इंग्रजीमध्ये असलेल्या या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद सई परांजपे यांनी केला असून त्यामधूनही नसीर यांची परखड लेखणी झळकते. कोणताही आडपडदा न ठेवता. त्यांची परखडे मतं आणि बेधडक लिखाणं थेड काळजाला भिडतं.
बॉलिवूडमध्ये आपलं वेगळेपण जपणाऱ्या या अवलियाचा आज वाढदिवस. नसीर यांचा जन्म 20 जुलै 1949मध्ये उत्तरप्रदेशातील बाराबंकीमध्ये झाला. त्यांचे वडिल एक आर्मी ऑफिसर होते, तर आई गृहीणी होती. नसीरुद्दीन शाह आणि त्यांचा अभिनय चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानामुळे त्यांना पद्मश्री आणि पद्म भूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या बाबतीतील काही खास गोष्टी जाणून घेऊयात...
वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या वयापेक्षा 15वर्षांनी मोठ्या असलेल्या मनारा सीकरीसोबत लग्न केलं होतं. त्यांच्या पत्नी मनारा यांना परवीना मुराद या नावानेही ओळखले जाते. जेव्ह नसीर यांनी मनारासोबत लग्न करण्याची इच्छा घरातल्यांना सांगितली होती त्यावेळी त्यांच्या घरातल्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता.
घरातल्यांचा विरोध असतानाही नसीर यांनी मनारासोबत लग्न केलं. लग्नानंतर वर्षभरातच मनारा यांनी एका मुलीला जन्म दिला. तिचं नाव नसीर यांनी हीबा शाह असं ठेवलं. त्यानंतर वर्षभरातच नसीर आणि मनारा यांच्यात खटके उडायला लागले. 1982मध्ये नसीर आणि मनारा यांच्यात घटस्फोट झाला.
काही दिवसांनी मनारा आपल्या मुलीला घेऊन ईराणमध्ये निघून गेली. जेव्हा हीबा मोठी झाली त्यावेळी ती आपल्या आईला सोडून वडीलांकडे म्हणजे नसीर यांच्यासोबत राहू लागली. पुढे जाऊन हीबाने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. सध्या ती आपले वडिल, सावत्र आई आणि सावत्र भावंडांसह राहते.
नसीर यांनी मनारा पासून विभक्त झाल्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अॅक्टिंगचा कोर्स केला होता. येथूनच त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली. 1975मध्ये त्यांची भेट रत्ना पाठक यांच्यासोबत झाली. रत्ना त्यावेळी एक कॉलेज स्टुडंट होती. नसीर आणि रत्ना एका नाटकाच्या रिर्हसल दरम्यान भेटले होते. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या, दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. 1982मध्ये या दोघांनी लग्न केलं. नसीर आणि रत्ना यांना दोन मुलं असून त्यांची नावं इमाद आणि विवान आहे.