Happy BirthdayPritam : ‘त्या’ बसने घडवले संगीत दिग्दर्शक प्रीतमचे नशीब!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 6:24 AM
धूम, ऐ दिल है मुश्किल, मेट्रो आणि बर्फी सारख्या चित्रपटांच्या गीतांना संगीत देणारा संगीतकार प्रीतम चक्रवर्ती उर्फ प्रीतम याचा ...
धूम, ऐ दिल है मुश्किल, मेट्रो आणि बर्फी सारख्या चित्रपटांच्या गीतांना संगीत देणारा संगीतकार प्रीतम चक्रवर्ती उर्फ प्रीतम याचा आज (१४ जून) वाढदिवस. संगीताचा वारसा प्रीतमला घरातूनचं मिळाला. प्रीतमचे वडील संगीताचे शिक्षक होते. अगदी नाममात्र मोबदल्यात ते विद्यार्थ्यांना संगीत शिकवत. प्रीतमही त्यांच्याकडूनचं शिकला. शाळेत असतानापासून तो गिटार वाजवायचा. १४ जून १९७१ रोजी कोलकात्यातील एका बंगाली कुटुंबात प्रीतमचा जन्म झाला.प्रीतमने एफटीआयआय , पुणे येथून साऊंड इंजिनिअरिंग केले. यानंतर त्याची पाऊले मुंबईकडे वळली आणि येथे अनेकांच्या वाट्याला येणारा संघर्ष त्याच्याही वाट्याला आला. राजकुमार हिराणी, शांतनु मोइत्रा, जीत गांगुली यांच्यासारख्या लोकांसोबत प्रीतमनेही स्ट्रगल केले. प्रीतमने साऊंड इंजिनिअरिंग करायचे का ठरवले, यामागे एक इंटरेस्टिंग कहाणी आहे. होय, प्रीतमने एका मुलाखतीत ती सांगितली होती. त्याने सांगितले होते की, संगीत दिग्दर्शक बनण्याचा खरे तर माझा कुठलाही इरादा नव्हता. संगीत हा माझा केवळ छंद होता. सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षणाची व सोबत सोबत एखाद्या नोकरीसाठी माझे प्रयत्न सुरू होते. एकदिवस मी अनेक प्रवेश परिक्षांची विवरणपत्रिका आणली. त्यात एफटीआयआयच्या प्रवेश परिक्षेचीही माहिती होती. मला त्यावेळी ते काहीसे इंटरेस्टिंग वाटले. मी त्यासाठी आणि एका नोकरीच्या भरती पूर्वपरिक्षेसाठी अशा दोन्हींसाठी अर्ज केला. योगायोगाने दोन्हींचे प्रवेशकार्ड आलेत. दोन्ही परिक्षा एकाचदिवशी होत्या, म्हणून दोन्हींचे प्रवेशकार्ड घेऊन मी कोलकात्याच्या बसस्टँडवर आलो. पण यापैकी कुठली परिक्षा द्यायची, याचा माझा निर्णय तोपर्यंतही झालेला नव्हता. माझ्या आईवडिलांना मी नोकरीसाठी प्रयत्न करावे असे वाटत होते. पण मला काय वाटत होते, ते मला ठाऊक नव्हते. कोलकात्याच्या बस स्टँडवर मी एका स्टॉलवर चहा घेतला आणि बसची वाट पाहू लागलो. एफटीआयआयच्या परिक्षेसाठी मला दक्षिण कोलकात्याची बस पकडावी लागणार होती आणि नोकरीसाठी मात्र उत्तरेकडच्या कॉलेज स्ट्रिटला जावे लागणार होते. मी द्विधामन:स्थितीत होतो. अशात आधी साऊथ कोलकात्याची बस आली आणि मी तिच्यात चढलो आणि या बसने माझे पुढचे नशीब लिहिले. मी एफटीआयआयची परिक्षा दिली़ या संस्थेने मला एक नवी वाट दाखवली़.चित्रपटात काम करण्यापूर्वी प्रीतमने सेंट्रो कार, थम्स अप, लिम्का, मॅकडोनाल्ड्ससाठी जिंगल बनवलेत. पुढे प्रीतमला चित्रपटांत संधी मिळाली आणि त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. सुरुवातीच्या दिवसांत त्याने जीत गांगुलीसोबत काम केले. यानंतर ‘तेरे लिए’ या चित्रपटात प्रीतमला संगीतकार म्हणून संधी मिळाली. ALSO READ : प्रीतम आहे या गोष्टीच्या शोधात?प्रीतमबद्दल एकदा अमिताभ बच्चन बोलले होते. प्रीतमसोबत काम करणे अतिशय आव्हानात्मक आहे. तो शेवटपर्यंत त्याच्या गाण्यात बदल करत राहत. क़दाचित हेच, त्याची गाणी हिट होण्यामागचे रहस्य असावे. प्रीतम सांगतो, एखाद्या गाण्याला संगीत देताना ते कुणाकडून गाऊन घ्यायचे, हे मी आधीच ठरवलेले असते. ‘जब वुई मेट’साठी ‘मी तुम से’ ही कम्पोज केले. मी त्यासाठी मोहित चव्हाणचे नाव ठरवले होते. पण माझा त्याच्याशी जवळपास महिनाभर संपर्क होऊ शकला नाही. मी त्याची महिनाभर वाट पाहिली. पण त्याच्याचकडून गाणे गाऊन घेतले.