अभिनेत्री राधिका आपटे हिने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. राधिका शेवटची रात अकेली है चित्रपटात झळकली आहे. कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये राधिका लंडनमध्ये होती. नुकतीच ती पुन्हा मुंबईत परतली आहे. आज राधिकाचा नवरा बेनेडिक्ट टेलरचा वाढदिवस असून राधिकाने त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राधिका आपटे हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, आनंदी सोळा. फक्त दोन वर्षात तू प्यायला सुरूवात केली.
राधिकाच्या नवऱ्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. राधिकाच्या नवऱ्याचं नाव बेनेडिक्ट टेलर असून तो लंडनमध्ये स्थायिक आहे. तो एक संगीतकार आहे. राधिका व टेलरनं २०१२ साली लग्न केलं. राधिकाला शूटिंगमधून जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा ती लंडनला जाते.
असं सांगितलं जातं ती राधिका व बेनेडिक्ट यांची भेट २०११ साली झाली होती जेव्हा राधिका कंटेम्परेरी डान्स शिकण्यासाठी लंडनला गेली होती. एक वर्षे डेट केल्यानंतर या दोघांनी २०१२ साली लग्न केलं आणि २०१३मध्ये अधिकृतपणे जाहीर केलं होतं.
राधिका म्हणाली, जेव्हा टेलरने मला डेट करायला सुरूवात केली होती. त्यावेळी त्याने आपली नोकरी सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आम्हा दोघांना हे योग्य वाटले नाही.
आम्ही दोघे आमच्या करियरकडे गांभीर्याने पाहतो. त्यामुळे काम सोडून आम्ही दोघेही खूश राहू शकत नाही. त्यामुळे आम्ही दोघेही कामांना प्राधान्य देतो व एकमेकांना नेहमी प्रोत्साहन देतो.