सिटीलाईट्स, शादी में जरूर आना, न्यूटन, स्त्री असे शानदार चित्रपट देणारा अभिनेता राजकुमार राव याचा आज (31 ऑगस्ट) वाढदिवस. अनेक संघर्षानंतर राजकुमारने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक ओळख निर्माण केली. लहानपणापासून राजकुमार राव बॉलिवूड स्टार्सची मिमिक्री करायचा. पण भविष्यात अभिनेता बनण्याचा विचारही त्याच्या मनात नव्हता. मात्र दहावीत असताना त्याने एका नाटकात काम केले आणि इथूनच अभिनेता बनायचा निर्णय त्याने घेतला. अर्थात यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला.
मुंबईत कामाच्या शोधात आलेल्या राजकुमारला त्याकाळी काही लहान-मोठया जाहिराती मिळाल्या. त्याकाळात अनेकदा खाण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसायचे. अशावेळी मित्रांना फोन करून जेवणाची व्यवस्था करायचा. मित्रांच्या भरवशावर राजकुमारने अनेक रात्री काढल्या.
रोज वेगवेगळ्या कास्टिंग डायरेक्टर्सला भेटायचे आणि त्यांना काम मागायचे, असे सुमारे वर्षभर केल्यानंतर एकदिवस राजकुमारची नजर एका जाहिरातीवर गेली. दिवाकर बॅनर्जी यांना आपल्या चित्रपटासाठी एक नवा चेहरा हवा होता, अशी ही जाहिरात होती. याच जाहिरातीने राजकुमारचे नशिब फळफळले. राजकुमारने यासाठी ऑडिशन दिले आणि राजकुमारला ‘लव्ह, सेक्स और धोखा’हा पहिला चित्रपट मिळाला. पण त्याला खरी ओळख मिळाली ती ‘काई पो छे’ या चित्रपटाने. पहिल्या चित्रपटातील राजकुमारच्या कामाचे अमाप कौतुक झाले. यानंतर मात्र त्याने कधीच मागे वळून बघितले नाही.
राजकुमारचे खरे आडनाव यादव आहे. पण हरियाणामध्ये राव आणि यादवचा अर्थ एकच आहे, असे राजकुमार सांगतो. इतका संघर्ष करूनही लेकाला यश मिळत नाही, असे दिसल्यावर आईने राजकुमारला नावात बदल करण्याचा सल्ला दिला होता. आईच्या सांगण्यावरून राजकुमारने त्याच्या नावातल्या स्पेलिंगमध्ये आणखी एक ‘एम’जोडण्याचा आणि आडनाव बदलले होते. त्याच्या आईला एका न्यूमरोलोजिस्ट हा सल्ला दिला होता.
टीव्ही जाहिरातीत पत्रलेखाला (अनविता पॉल) पाहून राजकुमारला तिच्या प्रेमात पडला. दोघांनी नंतर एकत्र ‘सिटीलाईट्स’मध्ये काम केले.