रणबीर कपूरचा आज म्हणजे 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्याने आज बॉलिवूडमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. रणबीरने खूपच कमी वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. कपूर कुटुंबात जन्मलेल्या रणबीरला लहानपणापासूनच बॉलिवूडविषयी आकर्षण होते. त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. दहावी झाल्यानंतर त्याने आ अब लौट चले या चित्रपटासाठी त्याच्या वडिलांना असिस्ट केले होते.
त्यानंतर रणबीर कपूरने परदेशात जाऊन फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतले आणि संजय लीला भन्साळीला ब्लॅक या चित्रपटासाठी असिस्ट केले. याच चित्रपटाच्या दरम्यान भन्साळीने त्याला सावरिया या चित्रपटाची ऑफर दिली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपयश मिळाले असले तरी या चित्रपटातील रणबीरच्या भूमिकेचे कौतुक झाले. या चित्रपटासाठी त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले. त्याने त्यानंतर बचना ए हसिनो या चित्रपटात काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला. पण रणबीरला खऱ्या अर्थाने वेक अप सिड या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली.
रणबीर कपूरने आजवर अजब प्रेम की गजब कहानी, रॉकेट सिंग, बर्फी, संजू यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. रणबीर लहान असताना त्याचे वडील ऋषी कपूर आणि आई नीतू सिंग यांच्यात सतत वाद व्हायचे असे रणबीरने एका मुलाखतीत सांगितले होते. रणबीरने सांगितले होते की, त्यांची भांडणे कधी कधी तर इतकी विकोप्याला पोहोचायची की मी घराच्या पाऱ्यांवर रात्रभर बसून राहायचो. त्यांची भांडणं कधी संपणार याची वाट पाहायचो. कधी कधी तर सकाळी पाच-सहा पर्यंत असेच सुरू असायचे. अनेक वर्षांपर्यंत माझ्या पालकांचे पटत नव्हते. त्यामुळे या सगळ्यात मी काय करू हेच मला कळायचे नाही. या सगळ्याचा माझ्यावर परिणाम होऊ नये यासाठी माझी आई प्रयत्न करायची. पण तरीही त्यांच्या नात्यातील कटुता पाहातच मी लहानाचा मोठा झालो.