बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा हिचा आज (१०आॅक्टोबर) वाढदिवस. रेखा म्हटले की आजही डोळ्यांसमोर येते ती भरजरी साडी, लांबसडक मोकळे केस, कपाळावर मोठ्ठी लाल टिकली अन् भांगात लाल कुंकू, बोलके डोळे आणि तेवढेच भेदक आणि गूढ हास्य. वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणा-या रेखाचे आयुष्य कायम चर्चेत राहिले. ‘रेखा- द अनटोल्ड स्टोरी’ लिहिणारे यासेर उस्मान यांनी आपल्या पुस्तकात रेखाच्या आयुष्यातील अनेक घटनांवर प्रकाश टाकला आहे. रेखाचे वडील जेमिनी गणेशन हे साउथचे सुपरस्टार होते. त्यांची चार लग्नं झाली होती. मात्र रेखाच्या आईसोबत लग्न करण्यास त्यांनी नकार दिला होता. जेव्हा रेखा ९वी मध्ये होती तेव्हा पैसे कमावण्यासाठी म्हणून तिला शाळा सोडावी लागली आणि मग रेखाने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रेखा केवळ १५ वर्षांची होती़ एकदा नैरोबीमधले निर्माता कुलजीत पाल वाणीश्री या तामिळ अभिनेत्रीबरोबर करार करायला जेमिनी स्टुडिओमध्ये आले होते. त्यांची नजर एका मुलीवर पडली. कुलजित यांना तिच्यात काहीतरी खास जाणवलं आणि ते संध्याकाळी तिच्या घरी पोहोचले. रेखाला हिंदी येत नव्हतं. मग कुलजीत यांनी हिंदीत एक डायलॉग लिहिला. रेखाने मग तो रोमन लिपीत लिहिला आणि चहा संपत नाही तोच रेखाने एका श्वासात तो म्हणून दाखवला.कुलजीत यांनी तेव्हाच रेखाला आपल्या फिल्मसाठी साइन केलं आणि अशा प्रकारे भानुरेखा नावानं ओळखल्या जाणा-या रेखाचा चंदेरी दुनियेतला प्रवास ‘अनजाना सफर’ चित्रपटाने सुरू झाला.
‘अनजाना सफर’ हा रेखाचा पहिला चित्रपट होता. पण या पहिल्याचं चित्रपटाने रेखाच्या डोळ्यांत अश्रू दाटले. या चित्रपटात रेखाचा हिरो होता विश्वजीत़ या पहिल्याच चित्रपटात दिग्दर्शक राजा नवाथे यांनी रेखावर पाच मिनिटांचं चुंबनदृश्य चित्रित केलं. राजा यांनी अॅक्शन म्हटलं, विश्वजीतने रेखाला मिठीत घेत तिच्यावर चुंबनाचा वर्षाव केला. कॅमेरा सुरूच राहिला. दिग्दर्शक तर थांबलाच नाही पण विश्वजीतसुद्धा थांबला नाही. यादरम्यान युनिटचे लोक मजा बघत होते, शिट्ट्या मारत होते. काय होतयं हे कळायच्या आत शॉट संपला़ पण तो शॉट रेखा कधीच विसरू शकली नाही. शॉट संपल्यानंतर तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.