मखमली आवाजाचे धनी असलेले गायक अशी ओळख असणारे हरिहरन यांनी जगभरात आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आजही ते संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. हरिहरन यांनी गायिका साधना जेजुरीकर यांच्या साथीनं गायलेली एक सुमधूर गझल नुकतीच रसिक दरबारी रेकॉर्ड केली आहे. संगीत क्षेत्रातील विविध मान्यवर या गझलवर कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे.
साधना जेजुरीकर यांची निर्मिती असलेली 'दूरीयां...' हि गझल नुकतीच रिलीज करण्यात आली आहे. हरीहरन यांच्या साथीने साधना जेजुरीकर यांनी आपल्या सुमधूर गायकीच्या आधारे गझलमधील शब्दरचनांना अचूक न्याय दिला आहे. 'दूरीयां...'बाबत हरीहरन म्हणाले की, आजवर मी बऱ्याच गझल्स गायल्या आहेत, पण 'दूरीयां...' गाताना एका वेगळ्या प्रकारचं आत्मीक समाधान लाभलं. या गीतातील शब्दरचना आणि त्याला अनुरूप अशी संगीतरचना यांचा अद्भूत संगम संगीतप्रेमींच्या मनाला भिडणारा असून, मला स्वत:ला आनंदाची अनुभूती देणारा ठरला आहे. ही गझल ऐकताना आणि पाहताना रसिकांनाही याची प्रचिती येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
साधना जेजुरीकर म्हणाल्या की, रसिकांची आवड लक्षात घेऊन 'दूरीयां...'ची निर्मिती करण्यात आली आहे. 'दूरीयां...' ही गझल हरिहरन यांनी आपल्या गायकीनं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे. या गझलच्या निमित्तानं त्यांच्यासारख्या आघाडीच्या गायकासोबत गाण्याची संधी मिळाल्यानं खूप आनंदी आहे. संगीतप्रेमींही 'दूरीयां...'वर नक्कीच भरभरून प्रेम करतील याची खात्रीही त्यांनी दिली.