भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवन प्रवासावर आधारित सिनेमा 'The Accidental Prime Minister'चा ट्रेलर आऊट झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ट्रेलरची वाट प्रेक्षक मोठ्या आतुरतेने पाहत होते अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. या सिनेमात मनमोहन सिंग यांची भूमिका अनुपम खेर साकारत आहे.
संजय बारू यांची भूमिका सिनेमात अक्षय खन्ना साकारत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच संजय बारूंच्या भूमिकेत असलेला अक्षय खन्ना म्हणतो, मला तर डॉ. साहेब भीष्म सारखे वाटले होते ज्यांच्यात कोणतेचे वाईट गुण नाहीत मात्र फॅमिली ड्रामाने त्यांची विकेट घेतली. मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत अनुपम खेर हुबेहुबे दिसतायेत. त्यांनी ही भूमिका साकारण्यासाठी विशेष मेहनत घेतली असल्याचा अंदाज ट्रेलर बघून येतो. सिनेमात मनमोहन सिंग, राहुल गांधी, सोनिया गांधी यांची नावे उघडपणे घेतली गेली आहेत.
मनमोहन सिंग यांची पत्नी गुरशरण कौर यांची भूमिका दिव्या सेठ शाह साकारत आहेत. प्रियांका गांधीची भूमिका अहाना कुमरा दिसतेय तर राहुल गांधीची भूमिका अर्जुन माथुर साकारत आहे.
येत्या वर्षात लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत त्यामुळे ट्रेलर बघितल्यानंतर काँग्रेस यावर निषेध नोंदवू शकते. येत्या 11 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे मात्र त्यापूर्वी मोठा वाद होण्याची शक्यता आहे.