बॉलिवूडमध्ये विविध विनोदी भूमिकांमुळे राजपाल यादव चर्चेत आहेत. राजपाल यादव यांनी 'चुप चुप के', 'भूल भूलैय्या', 'मालामाल विकली' अशा विविध सिनेमांमध्ये साकारलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहिल्या. राजपाल फार क्वचितच गंभीर भूमिकांमध्ये दिसले. राजपाल यांची गंभीर भूमिका असणारा असाच एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तो म्हणजे 'काम चालू है'.
हा सिनेमा सांगलीच्या मराठमोळ्या कुटुंबात घडणाऱ्या एका सत्य घटनेवर आधारीत आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला पाहायला मिळतं की, खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या खुप जास्त आहे. पुढे सांगलीतलं एक कुटुंब दिसतं. या कुटुंबातील राजपाल यादव पोलीस स्टेशनमध्ये एका खड्ड्याची तक्रार करायला जातात. कारण या खड्ड्यामुळे राजपालची मुलीचा जीव जातो. पोलीस ही तक्रार नोंदवून घेण्यास मनाई करतात. मग पुढे अनेक हृदयस्पर्शी घटना या ट्रेलरमध्ये दिसतात.
'काम चालू है' सिनेमात राजपाल यादव, जिया मनेक आणि बालकलाकार कुरंगी नागराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजपाल यादव यांचा जबरदस्त अभिनय ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. खड्ड्यांमुळे जात असणारा लोकांचा जीव, अशा महत्वाच्या विषयावर सिनेमा भाष्य करणार आहे. हा सिनेमा १९ एप्रिलला झी 5 या ओटीटीववर रिलीज होणार आहे.