हेलन हे नाव उच्चारताच आठवतो तो कॅब्रे. कॅब्रे या नृत्याविष्काराला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणा-या अभिनेत्री हेलन यांचा आज वाढदिवस. कॅब्रे डान्स भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय हेलन यांना जाते. तसेच बॉलीवूडच्या पहिल्या आयटम गर्लचा मान सुद्धा त्यांनाच जातो. 500 पेक्षा अधिक सिनेमात काम करणा-या हेलन यांनी वयाच्या 19 व्या वर्षी ‘हावडा ब्रिज’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला.
हेलन यांचे पूर्ण नाव हेलन रिचर्डसन खान आहे. त्यांचा जन्म म्यानमार येथे झाला. हेलन यांचे वडील अँग्लो-इंडियन होते. दुस-या महायुद्धात हेलन यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या आईने भारतात येण्याचे ठरवले. उण्यापु-या तीन वर्षांच्या हेलनला घेऊन आई भारतात आली. तो सुद्धा म्यानमार ते भारत अतिशय हालअपेष्ठा सहन करत आणि तब्बल नऊ महिन्यांचा प्रवास करून. यादरम्यान हेलन यांनी आपल्या भावाला कायमचे गमावले.आई नर्स म्हणून काम करू लागली.पण त्याने भागणारे नव्हते. आर्थिक चणचण इतकी की, हेलन यांनी आपले शालेय शिक्षण अर्धवटच सोडून दिले आणि पैशांसाठीच त्यांनी बॉलिवूडमध्ये डान्स करण्याचा निर्णय घेतला. प्रसिद्ध नृत्यांगना कुक्कूने हेलन यांना सिनेमांमध्ये डान्स करण्याचा सल्ला दिला. कुक्कूच्या मदतीनेच हेलन यांचे बॉलिवूड करिअर सुरू झाले.
‘हावडा ब्रिज’ या सिनेमात पहिली संधी 19 व्या वर्षी हेलन यांना ‘हावडा ब्रिज’ या सिनेमात संधी मिळाली. या सिनेमातील मेरा नाम चिन चिन चू या गाण्याने हेलन यांचे नशीबच बदलले. त्यांच्या सौंदर्याने आणि अदांनी सर्वांना भुरळ पाडली. त्यानंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 27 वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबत केले लग्न 1957 मध्ये हेलन यांनी स्वत:पेक्षा तब्बल 27 वर्षांनी मोठे दिग्दर्शक पीएन अरोराशी लग्न केले. ‘रेल का डिब्बा’ या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान हेलन व पी.एन. अरोरा एकमेकांना भेटले आणि पुढे एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे लग्नही झाले. पण त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही. हेलन त्याकाळात यशाच्या शिखरावर होत्या. त्या कमवायच्या आणि त्यांचा पती पैसे उडवायचा. यावरून दोघांमध्ये सारखे खटके उडू लागले. अखेर या सततच्या भांडणांना कंटाळून हेलन यांनी पतीपासून घटस्फोट घेतला.
अन् सलीम खान यांची एन्ट्री झालीपतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर हेलन एकाकी पडल्या होत्या. करिअरलाही उतरती कळा लागली होती. अशा काळात लेखक सलीम खान (सलमान खानचे वडील) हेलनच्या आयुष्यात आले. सुरुवातीला दोघांची मैत्री झाली. पण या मैत्रीचे प्रेमात कधी रूपांतर झाले ते दोघांनाही कळले नाही. सलीम खान आधीच विवाहित होते. पत्नी व मुलांनी विरोध केला पण सलीम खान यांनी हेलन यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केलेही. 1981 साली हेलन आणि सलीम लग्नबंधनात अडकले. लग्न करून हेलन पहिल्यांदा सलीम यांच्या घरी गेल्या तेव्हा सलमान, अरबाज आणि त्यांच्या आई सलमा खान यांनी हेलन यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. पण कालांतराने याच हेलन सलीम यांच्या मुलांच्या दुस-या आई बनल्या. सलमान आज जितका आपल्या आईला मानतो तितकाच हेलन यांनाही मानतो. लग्नानंतर हेलन आणि सलीम खान यांना एकही अपत्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी अर्पिताला दत्तक घेतले.