Join us

सावत्र भावंडांना एकत्र बघून हेमा मालिनी म्हणाल्या, "यात काही नवीन नाही कारण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 12:41 IST

सनी आणि बॉबीबद्दल हेमा मालिनींचा खुलासा

यंदाचं वर्ष हे सनी देओलचं आहे. 'गदर 2' (Gadar 2) च्या यशाने सगळीकडेच त्याची चर्चा आहे. २००१ साली आलेल्या 'गदर एक प्रेम कथा'ने जसा इतिहास घडवला.  तसाच प्रतिसाद 'गदर 2'ला देखील मिळत आहे. १० च दिवसात सिनेमा ३०० कोटींच्या पार गेलाय. सिनेमाच्या यशामुळे देओल कुटुंब पुन्हा प्रसिद्धीझोतात आलंय. हेमा मालिनी यांच्या मुली ईशा देओल आणि आहाना देओल दोघींनी आपल्या सावत्र भावांसोबत सिनेमाचं यश साजरं केल्याचं चित्र पाहायला मिळालं. सावत्र भावंडं एकत्र येण्यावर हेमा मालिनी यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

७० च्या दशकातील हँडसम अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे दोन कुटुंब आहेत. पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यापासून त्यांना सनी आणि बॉबी ही मुलं आहेत. तर हेमा मालिनी यांच्यापासून ईशा आणि आहाना या मुली आहेत. धर्मेंद्र यांनी दोन्ही कुटुंबांना आधीपासूनच वेगळं ठेवलं. त्यामुळे ही सावत्र भावंडं फारशी एकत्र दिसलीच नाहीत. पण 'गदर 2' च्या निमित्ताने चारही जण कॅमेऱ्यासमोर आले. यावर हेमा मालिनी यांनी यात काही नवं नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेमा मालिनी म्हणाल्या, "हे फारच सामान्य आहे. सनी आणि बॉबी अनेकदा घरी येतात. मात्र ते कधी याची वाच्यता किंवा प्रसिद्धी करत नाहीत. फोटो काढून लगेच इन्स्टाग्रामवर पोस्ट करणाऱ्यांपैकी ते नाहीत. आमचं कुटुंब असं नाहीए. आम्ही सगळे एकमेकांसोबत आहोत. संकटकाळी आम्ही एकमेकांची साथ देतो.इतकंच की कॅमेऱ्यासमोर ते पहिल्यांदाच आले."

सनी देओलचा मुलगा करण देओलचं मागच्याच महिन्यात लग्न झालं. तेव्हाही हेमा मालिनी लग्नात हजर राहिल्या नव्हत्या म्हणून चर्चेला उधाण आलं होतं. दोन्ही कुटुंब आजही एकमेकांच्या संपर्कात नसतात अशी चर्चा सुरु झाली होती. आता यावर हेमा मालिनी यांनी पूर्णविराम दिला आहे.

टॅग्स :हेमा मालिनीसनी देओलबॉबी देओलइशा देओलधमेंद्रबॉलिवूड