सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटानंतर सनी देओलच्या ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. या चित्रपटांमुळे बॉलिवूडला अच्छे दिन येणार असल्याची चर्चा आहे. ‘पठाण’ आणि ‘गदर २’ या चित्रपटाच्या यशाबाबत सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनींनी भाष्य केलं आहे. हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरण्यामागचं कारण हेमा मालिनींनी सांगितलं आहे.
‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनींनी ‘गदर २’ आणि ‘पठाण’बाबत भाष्य केलं. याबरोबरच त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दलही मत मांडलं. या मुलाखतीत हेमा मालिनींनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा ‘टाइमपास’ असा उल्लेख केला आहे. “मोठ्या पडद्यावरील चित्रपट हे फार वेगळे असतात. आपल्याला असेच चित्रपट पाहण्याची सवय आहे. ओटीटी आणि वेब सीरिज हे फक्त टाइमपास म्हणून बघण्यासाठी छान आहे. पण, त्या किती चांगल्या आहेत, हे मला माहीत नाही. म्हणूनच पठाण, 'गदर २' सारखे मोठ्या पडद्यावरील चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. लोकांना रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहायला आवडतात. जे छोट्या पडद्यापेक्षा फार वेगळं आहे,” असं त्या म्हणाल्या.
काही दिवसांपूर्वीच हेमा मालिनींनी सनी देओलच्या ‘गदर २’चं कौतुक केलं होतं. हा चित्रपटही त्याने माझ्यामुळेच केला, असं त्या म्हणाल्या होत्या. “सनीचा चाहतावर्ग मोठा आहे. चाहत्यांना त्याला मोठ्या पडद्यावर पाहायचं असतं. मी नेहमी सनीला सांगायचे की तुला बेस्ट फिल्म द्यावीच लागेल. तुला करावंच लागेल. त्यानेही मला वचन दिलं होतं की तो करेल आणि त्याने करुन दाखवलंच. तो खूप गोड आहे. त्याने माझ्या सांगण्यावरुन हा सिनेमा केला. जे अपेक्षित होतं तसंच होतं. असं वाटलं की मी परत ७०-८० च्या दशकात गेली आहे. सनीने यामध्ये कमाल केली आहे. २२ वर्षांनंतरही तारा सिंग आणि सकीनाची जोडी सुंदर दिसत आहे,” असं हेमा मालिनी म्हणाल्या होत्या.
शाहरुख खानच्या ‘जवान’चा नवा रेकॉर्ड, ‘या’ चित्रपटगृहात सकाळी ६चा शो लागणार
दरम्यान, ११ ऑगस्टला प्रदर्शित झालेला 'गदर २' बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत ४५६ कोटींची कमाई केली आहे. 'गदर २'मध्ये सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.