मासिक पाळीच्या काळात देवळात आणि किचनमध्ये जायचे नाही असे सोनम कपूरला बजावले होते तिच्या आजीने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 7:24 AM
सोनम कपूर पॅडमॅन या चित्रपटात प्रेक्षकांना एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील तिची भूमिका ही तिच्या आजवरच्या ...
सोनम कपूर पॅडमॅन या चित्रपटात प्रेक्षकांना एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील तिची भूमिका ही तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. या चित्रपटासाठी तिने चांगलीच मेहनत देखील घेतली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान नुकतीच सोनमने एक गोष्ट तिच्या फॅन्सना सांगितली आहे. मासिक पाळी आल्यानंतरच्या काळातील एका अनुभवाविषयी तिने नुकतेच सांगितले आहे. सोनम कपूरची आजी तिला मासिक पाळीच्या काळात मंदिरात आणि किचनमध्ये जाऊन देत नसे असे तिने तिच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.सामान्य मुलींना मासिक पाळीमध्ये त्यांच्या घरातल्यांकडून अनेक गोष्टी करण्यास मज्जाव केला जातो. पण सोनम कपूरला देखील तिच्या घरात या गोष्टी सहन कराव्या लागल्या. सोनमचे वडील अनिल कपूर हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यामुळे तिच्या घरचे वातावरण हे सामान्य लोकांच्या घरासारखे नसावे असेच आपल्याला वाटते. पण सामान्य मुलींप्रमाणे सोनमला देखील मासिक पाळीदरम्यान अनेक गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली होती. याविषयी सोनम सांगते, मासिक पाळीच्या दरम्यान किचन आणि देवळात जायचे नाही असे स्पष्ट माझ्या आजीने मला सांगितले होते. मी एका मोठ्या शहरात राहून देखील माझ्यावर इतकी बंधनं लादण्यात आली होती तर गावात राहाणाऱ्या मुलींचे काय हाल होत असतील याचा आपण विचार देखील करू शकत नाही असे मला वाटते. लोक मासिक पाळीविषयी बोलणेच पसंत करत नाहीत. माहेश्वर या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना लोकांच्या मनात मासिक पाळीविषयी किती चुकीच्या गोष्टी आहेत हे मला कळले होते. पण ज्यावेळी एखादी पब्लिक फिगर लोकांसोबत याबाबत बोलते, त्यावेळी फरक पडतो असे मला वाटते. सोनमचा पॅडमॅन हा चित्रपट २६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची कथा ही खऱ्या आयुष्यात घडलेली आहे. अक्षय गेल्या काही वर्षांपासून सतत हिट चित्रपट देत असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटापासून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. Also Read : सोनम कपूरसह वीरे दी वेडिंगची गर्ल गँग दिसली स्विमिंग पूलजवळ चील करताना