Join us

अभिनेता इरफान खानबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या 'या' इंटरेस्टिंग 10 गोष्टी, नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 12:37 PM

इरफान खानच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

बॉलिवूड दिग्गज अभिनेता इरफान खान याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या इरफानचे आज निधन झाले. त्याच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. इरफान खानने अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चे वेगळे असे भक्कम स्थान निर्माण केले. मागच्या काही वर्षांमध्ये त्याच्या वैविध्यपूर्ण फिल्मोग्राफीवर नजर टाकली असता त्याच्या अभिनयाच्या रेंजची कल्पना येते. नाव घ्यायचे तर 'अग्रेजी मीडियम', 'द लंचबॉक्स', 'हैदर', 'पिकू', 'ज्युरासिक पार्क', 'तलवार' आणि 'मदारी' या चित्रपटांची नावे पुरेसे आहेत. १९८८ साली त्याने हिंदी चित्रपटांत पदार्पण केले होते. परंतु खरी ओळख मिळाली ती २००० नंतरच..बॉलीवूड आणि हॉलीवूड अशा दोन्ही सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या इरफानच्या आयुष्यातील १० अशा गोष्टी आम्ही सांगत आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील. 

१. इरफान खानचे खरे नाव साहबजादे इरफान अली खान असे आहे. एवढे लांबलचक नाव सिनेमांत चालणार नाही म्हणून त्याने केवळ इरफान खान असे नाव धारण केले.

२. काही वर्षांपूर्वी त्याने नावात पुन्हा बदल केला. खान हे आडनाव वगळून तो केवळ इरफान असेच नाव लावणे पसंत करतो. 

३. त्याच्या पत्नीचे नाव सुतपा सिकदर असून ते दोघे दिल्लीला राष्ट्रीय नाट्य अकादमीमध्ये शिकत असताना भेटले होते. तेथे ते एकाच वर्गात असल्याने ओळख झाली. या जोडप्याला बबिल आणि आयन अशी दोन मुले आहेत.

४. समीक्षक आणि प्रेक्षकांनी वाहवाह केलेला ‘द लंचबॉक्स’ हा चित्रपट ‘टोरोंटो फिल्म क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्स’मध्ये पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय सिनेमा आहे.

५.. एकेकाळी त्याच्याकडे ‘ज्युरासिक पार्क’ हा चित्रपट पाहण्यासाठीदेखील खिशात पैसे नव्हते आणि आज त्याने न केवळ त्या सिनेमात स्वत: काम केले तर अनेक हॉलीवूड सिनेमांत (द नेमसेक, लाईफ ऑफ पाय, अमेझिंग स्पायडरमॅन, स्लमडॉग मिलेनेयर) तो झळकला आहे.

६. अमेरिकेत विमानतळावर आतापर्यंत त्याला दोनदा अडवण्यात आलेले आहे. एका दहशतवाद्याच्या नावाशी त्याच्या नावाचे साधर्म्य असल्यामुळे त्याला लॉस एंजिलिस (२००८) व न्यूयॉर्क (२००९) येथील विमानतळावर अडवण्यात आले होते.

७. लहानपणापासून त्याला क्रिकेटर होण्याची इच्छा होती; पण तसे होऊ न शकल्यामुळे तो अभिनेता झाला.

८. इरफानला मासांहार बिल्कुल आवडत नाही. म्हणून त्याचे वडील चेष्टेने त्याला म्हणायचे की, तो पठाणांच्या घरात जन्मलेला ब्राह्मण आहे.

९. तो लहानपणापासूनच मितभाषी आहे. लोकांशी पटकन बोलायला तो कचरतो.

१०.. क्रिस्टोफर नोलन दिग्दर्शित ‘इंटरस्टेलर’ या सिनेमात मॅट डेमन या हॉलीवूड अभिनेत्याने केलेल्या भूमिकेसाठी आधी इरफान खानला विचारणा करण्यात आली होती; मात्र त्याने ‘द लंचबॉक्स’ आणि ‘डी-डे’ या सिनेमांना तारखा दिलेल्या असल्यामुळे त्याने तो प्रस्ताव नाकारला.

टॅग्स :इरफान खान