सूर्यवंशम हा चित्रपट २१ मे १९९९ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला नुकतेच २० वर्षं पूर्ण झाले असून या चित्रपटात अमिताभ बच्चन, सौंदर्या, जयासुधा, कादर खान, अनुपम खेर, मुकेश ऋषी, बिंदू यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात अमिताभ मुलगा आणि वडील या दुहेरी भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करता आले नव्हते. पण सोनी मॅक्सवर हा चित्रपट अनेकवेळा दाखवण्यात आल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना आवडता चित्रपट बनला आहे. हा चित्रपट सतत सोनी मॅक्सला दाखवण्यामागे एक खास कारण आहे.
सूर्यवंशम हा चित्रपट सोनी मॅक्स या वाहिनीवर इतक्या वेळेस दाखवण्यात येतो की, त्यामुळे सोशल मीडियावर जोक्स देखील बनवले जातात. हा चित्रपट काही दिवस वाहिनीवर दाखवला गेला नाही तर लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. पण हा चित्रपट सोनी मॅक्सवर सतत का दाखवला जातो हे आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत. सेट मॅक्स म्हणजेच आताच्या सोनी मॅक्सने ‘सूर्यवंशम’ या चित्रपटाचे अधिकार तब्बल शंभर वर्षांसाठी विकत घेतले आहेत. त्यामुळे या चॅनेलवर हा सिनेमा वारंवार दाखवला जातो.
कुटुंबव्यवस्था आणि नातेसंबंधांवर भर देणारा, विविध भावभावनांची सरमिसळ असलेला हा सिनेमा तेलुगु दिग्दर्शक ई. व्ही. व्ही. सत्यनारायण यांचा बॉलिवुडमधील पदार्पणाचा सिनेमा होता. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला आणि एकमेव हिंदी सिनेमा आहे. तसेच या चित्रपटातील दोन्ही नायिका या दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत. यातील अमिताभ बच्चन यांच्या दुहेरी भूमिकेने समीक्षकांची वाहवा मिळवली आणि आजही त्यांची ही दुहेरी भूमिका लोकांच्या लक्षात आहे. ‘सूर्यवंशम’ या चित्रपटातील पात्र, कथा आणि संवाद आता प्रेक्षकांना तोंडपाठ झालेले आहेत. हिरा ठाकूर, गौरी, मेजर रंजित हे पात्र तर प्रेक्षकांचे प्रचंड लाडके आहेत. तसेच या चित्रपटातील कादर खान आणि अनुपम खेर यांची कॉमेडी देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते.
हा चित्रपट अनेकवेळा वाहिनीवर दाखवला जात असल्यामुळे प्रेक्षकांना तो पाहून कंटाळा येत असेल असे सगळ्यांना वाटत होते. पण हा चित्रपट प्रेक्षक अतिशय आवडीने पाहातात याविषयीचा एक डाटाच अमिताभ यांच्या फॅनने शेअर केला आहे आणि तो त्यांनी नुकताच रिट्वीट केला आहे.