राणी मुखर्जीच्या 'हिचकी' या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजल्या गेलेल्या सिनेमाने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली. हिचकीने जगभरात 250 कोटींहून अधिकची कमाई केली आणि अनेक आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवांमध्ये महत्त्वाचे पुरस्कारही पटकावले आहेत. यात राणीने शाळेतील शिक्षिकेची भूमिका साकारली होती. टॉरेट सिंड्रोम या स्वत:च्या आजाराशी लढताना ती आर्थिकदृष्ट्या वंचित निरागस मुलांना शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करते. या सिनेमाच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा म्हणाले की हिचकी सिनेमाने या आजाराबद्दल जागरुकता निर्माण करण्यात परिणामकारक वाटा उचलला, याचा त्यांना आनंद असल्याचे म्हंटले आहे.
अनेकांनी मला हे लिहून पाठवलं की आजवर याबद्दल बोलणं त्यांना लाजीरवाणं वाटतं होतं. या सिनेमाने शिक्षक, विद्यार्थी यांच्यावर केलेला परिणाम आणि कोणत्याही प्रकारचा त्रास असलेल्या लोकांना मिळवून दिलेला सन्मान इतकंच नाही प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता असते हे सत्य दाखवून दिलं याचा मला आनंद आहे," असे सिद्धार्थ म्हणाले.
अजूनही लोक मला भेटतात आणि सांगतात की वाह! काय छान सिनेमा होता. मला फार छान वाटतं कारण इथंवर येण्याचा प्रवास आणि आदी (चोप्रा) आणि मनीष (शर्मा) यांना हा सिनेमा माझ्या मनाप्रमाणे बनवू देण्यासाठी राजी करणं हे एक आव्हान होतं. त्यामुळे मी फारच आनंदी आहे."
हिचकीमधील सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं राणीचा अप्रतिम अभिनय ज्यामुळे जगभरात या सिनेमातील संदेश योग्यरित्या पोहोचू शकला. "तिने बरंच संशोधन केलं, टॉरेट असणाऱ्या लोकांना, मुलांना ती भेटली. काही मुलांना समोर यायचं नव्हतं, अनेक जण तिच्यासमोर बोलताना काहीसे अवघडले होते. पण मला वाटतं, ज्याच्यावर हा सिनेमा आधारित आहे त्या ब्रॅड कोहनसोबत काम करण्याची तिची बांधिलकी आणि ब्रॅडने तिला कशी मदत केली, तिने किती छान पद्धतीने हा विषय समजून घेतला, तो आत्मसात केला हे सगळंच फार वाखाणण्याजोगं आहे.
सिद्धार्थ म्हणतो की टॉरेटचा त्रास असणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारताना राणीने केलेल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ते म्हणाले, "तिचा आजवरचा अनुभव पाहता काय करायचं हे तिला सहज कळतं. मला वाटतं तिचा अभिनय अत्यंत अस्सल आणि नैसर्गिक असल्याने हा विषय भारतातच नाही तर जगभरात प्रेक्षकांना स्पर्शून गेला. मला आठवतं, चीनमध्ये गेल्यावर तर तिथे लोक तिच्यासाठी वेडे झाले होते. मला वाटतं, राणीसोबत काम करण्याची संधी ज्यांना मिळते त्यांची एक गडबड होते ती म्हणजे ती नेहमीच पहिल्या, फारफार तर दुसऱ्या टेकला काम पूर्ण करते आणि तुम्ही पुढे जातात. त्यामुळे खरंच राणीसोबत काम करत असाल तर तुम्ही नशीबवान आहात."
हिचकी करिअरचा सगळ्यात महत्त्वाचा सिनेमा आहे. कारण या सिनेमाने मला एक नवा जन्म दिला.