मुंबई - कर्नाटकातील हिजाब वाद न्यायालयाच्या निर्णयानंतरही मिटला नसल्याचे दिसून येत आहे. या वादामुळे कर्नाटकातील काही जिल्ह्यांत तणावाचे वातावरण असून आता शिवमोगा येथील घटनेनं खळबळ उडाली आहे. शिवमोगा येथे बंजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणात हिजाब वादाशी संबंध आहे का, याचा तपास पोलीस यंत्रणांकडून करण्यात येत आहे. मात्र, या घटनेचे देशभर पडसाद उमटताना दिसून येत आहेत. ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. अभिनेत्री रविना टंडनही या घटनेवर ट्विट केलं आहे.
कर्नाटकच्या शिवमोगा येथे रविवारी रात्री 9 वाजता ही हत्येची घटना घडली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. शिवमोगा येथे हत्या करण्यात आलेल्या 26 वर्षीय युवकाचे नाव हर्षा असून तो बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याचं उघडकीस आलं आहे. हर्षाने आपल्या फेसबुकवर हिजाबविरुद्ध पोस्टी केली होती, त्याने भगवा शालीचं समर्थन केलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हत्याप्रकरणानंतर शिवमोगा येथे तणावाचे वातावरण पसरले असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
गृहमंत्र्यांनी घेतली भेट, शाळा-कॉलेज बंद
घटनेनंतर वाढता तणाव पाहता कल 144 लागू करण्यात आले आहे. तसेच, शाळा आणि महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी पीडित कुटुंबीयांशी भेटून संवाद साधला. ज्ञानेंद्र यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटले की, हत्या करण्यात आलेल्या युवकांस 4 ते 5 जणांनी ठार मारल्याचा संशय आहे. पोलिसांचा तपास सुरू असून संबंधित आरोपी हे कुठल्या संघटनेशी संलग्नित आहेत का, याचाही तपास घेण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शिवमोगा जिल्ह्यात दोन दिवस शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, कर्नाटकातील हिजाब वादावर बंजरंग दल सर्वाधिक सक्रीय आहे. अनेक हिंदू संघटनाही शाळा-महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यास विरोध करत आहेत. हिजाब विरोधी प्रदर्शन करताना भगवी शाल गळ्यात घालून ते विरोध दर्शवताना दिसून येतात.