आपलं दु:खं विसरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची कला केवळ कलाकारांमध्येच पाहायला मिळते. त्यामुळे या कलाकारांच्या आयुष्यात कितीही वादळं, संकटं आली तरीदेखील ही कलाकार मंडळी प्रेक्षकांसमोर कायम हसत, उत्साहात येत असतात. यात काही असेही कलाकार आहेत ज्यांना सेटवर शुटिंग सुरु असतानाच काही दु:ख घटनांची माहिती मिळाली. परंतु, त्यांनी चित्रीकरण सुरु ठेवलं. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री हिमानी शिवपुरी (himani shivpuri). आपल्या दर्जेदार अभिनयामुळे प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या हिमानी यांचं शुटिंग सुरु असतानाच त्यांना त्यांच्या पतीच्या निधनाची माहिती मिळाली होती. मात्र, त्यानंतरही मोठ्या धीराने त्यांनी हा चित्रपट पूर्ण केला.
'कभी खुशी कभी गम', 'हम आपके हैं कौन', 'परदेश' अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हिमानी शिवपुरी. उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या हिमानी यांच्यावर 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटाच्या वेळी दु:खाचा डोंगर कोसळला होता. एकीकडे चित्रपटाचं शुटिंग सुरु असताना दुसरीकडे त्यांच्या पतीचं निधन झालं होतं. एका मुलाखतीत हिमानी यांनी हा किस्सा शेअर केला.
"मी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील क्लायमॅक्स सीनमध्येच कुठेच दिसून येत नाहीये. कारण, या सीनसाठी आम्हाला आऊटडोर शूटिंग करायची होती आणि त्याचवेळी मला माझ्या पतीच्या निधनाची माहिती मिळाली", असं हिमानी म्हणाल्या.
रोमँटिक सीन सुरु असताना मिळाली पतीच्या निधनाची माहिती
या चित्रपटात हिमानी शिवपुरी आणि अनुपम खेर यांचा एक रोमँटिक सीन होता. या सीनचं चित्रीकरण सुरु असतानाच हिमानी यांना त्यांच्या पतीच्या निधनाची माहिती मिळाली. त्यामुळे हा सीन त्यांनी कसाबसा पूर्ण केला. त्यामुळेच या चित्रपटातील क्लायमॅक्समध्ये त्या कुठेही दिसून आल्या नाहीत. हिमानी यांच्यावर बेतलेला प्रसंग पाहून चित्रपटाच्या टीमने सिनेमातील क्लायमॅक्समध्ये ऐनवेळी बदल केला.
दरम्यान, पतीच्या निधनानंतर हिमानी यांनी स्वत:ला सावरलं. आजही त्या कलाविश्वात सक्रीय असून आता त्यांच्यात कमालीचा बदल झाला आहे. चित्रपटांसह त्याा अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही काम करत असल्याचं पाहायला मिळतं.