राज कपूरच्या ‘हिना’ या चित्रपटात हिनाच्या मुख्य भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्रीला त्याकाळात चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या अभिनेत्रीचे नाव जेबा बख्तियार होते. हिनानंतर जेबा बॉलिवूडच्या काही चित्रपटात दिसली. पण या चित्रपटाला फारसे यश मिळू शकले नाही. यानंतर जेबाला बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले आणि जेबा बॉलिवूडमधून अचानक गायब झाली.
बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाल्यावर जेबाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या आयुष्यात जेबाने एक नाही, दोन नाही तर चार लग्नं केली. जेबाने सलमान वालियानीसोबत पहिले लग्न केले. त्यांना एक मुलगीही झाली. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. यानंतर जेबाने अभिनेता जावेद जाफरीसोबत लग्न केले. जेबा हे लग्न स्वीकारण्यास तयारच नव्हती. पण जावेदने ‘निकाहनामा’ दाखवल्यावर खरे ते सगळे जगासमोर आले.
सिंगर अदनान सामीसोबत जेबाने तिसरे लग्न केले. अदनान व जेबा यांना एक मुलगा झाला. पण जेबाचे हे दुसरे लग्नही केवळ दोन वर्षे टिकले. 1996 मध्ये दोघे विभक्त झालेत. बॉलिवूडमधील करिअर संपल्यानंतर जेबा पाकिस्तानला परतली होती. येथे तिने सोहेल खान लेगारीसोबत चौथे लग्न केले. चार लग्न झाल्यानंतरही जेबा आज एकटी राहाते.
1991 साली हिना हा चित्रपट रिलीज झाला. जेबासोबत ऋषी कपूर आणि अश्विनी भावे या चित्रपटात होते. पण जेबाच्या अभिनयापुढे सगळेच फिके पडले. तिच्यावर चित्रीत झालेले ‘मैं हू खुशरंग हिना’ हे या चित्रपटातील गाणे तुफान लोकप्रिय झाले होते. जेबाचे खरे नाव शाहिन होते. पाकिस्तानी नेता आणि माजी अॅटर्नी जनरल याह्या बख्तियारची जेबा मुलगी. लाहोरमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेबा पाकिस्तानात छोट्या पडद्यावर काम करू लागली. 1988 साली ‘अनारकली’ या मालिकेत तिने काम केले. हीच मालिका पाहून राज कपूर यांनी जेबाला ऑफर दिली असे म्हटले जाते.