अहमद खानद्वारे दिग्दर्शित साजिद नाडियादवाला यांच्या आगामी हिरोपंती २ ने मार्च महिन्यात मुंबईमध्ये एक छोटे शुटींग शेड्यूल पूर्ण केल्यानंतर आता टीमने आपला मोर्चा रशियाकडे वळवला आहे. चित्रपटाचे दुसरे शुटींग शेड्यूल रशियात पार पडणार आहे. टाइगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत ही टीम पुढच्या महिन्यात मॉस्कोमध्ये आणि त्यानंतर रशियात सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रीकरण करणार आहे.
हिरोपंती २शी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "टीम मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रपटातील प्रमुख अॅक्शन दृश्य आणि एका गाण्याचे चित्रीकरण करण्याची योजना बनवत असून तिथल्या स्थानिक टीमसोबत मिळून परफेक्ट लोकेशनचा शोध घेत आहे.
शिवाय चित्रपटातील लार्जर दॅन लाइफ अॅक्शन दृशांना चित्रित करण्यासाठी अनेक स्टंट डिजाइनर्ससोबत बोलणे सुरु आहे ज्यामध्ये एक नाव सुप्रसिद्ध मार्टिन इवानो यांचे आहे, जे स्कायफॉल (२०१२), द बॉर्न अल्टीमेटम (२००७) आणि द बॉर्न सुप्रमसी (२००४) साठी ओळखले जातात."
सूत्रांनी पुढे सांगितले की, "रशियात जाण्याआधी सर्व क्रू मेंबर्सचे लसीकरण पूर्ण करण्याकडे साजिद सर काटेकोरपणे लक्ष देत आहेत." हिरोपंती या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा नाडियाडवाला यांनी टाइगर श्रॉफला दमदार अॅक्शनसोबत जगासमोर आणले होते आणि आता हिरोपंती २ मध्ये देखील चमकदार आणि स्टाइलिश अॅक्शनचा जलवा पहायला मिळणार आहे.