दिवंगत अभिनेता राजकपूर यांच्या आर. के. स्टूडिओमध्ये आयोजित केलेली ‘होळी’ बॉलिवूड सेलिब्रेटींसाठी एका अविस्मरणीय उत्सवापेक्षा कमी नव्हती. या होळीसाठी बॉलिवूडमधील मोजक्याच सेलिब्रेटींना आमंत्रित केले जात होते. त्यामुळे ज्या कलाकाराला या समारंभात सहभागी होण्याचा मान मिळत होता, त्याच्यासाठी ही बाब खूपच गौरवपूर्ण होती. यावरून त्या सेलिब्रेटीच्या इंडस्ट्रीमधील स्थानाचा अंदाज लावला जात होता. या होळी सेलिब्रेशनसाठी महानायक अमिताभ बच्चन यांना आमंत्रित करण्यात आले तेव्हा त्यांचे नशीबच पालटले होते.
खरं तर त्या काळात अमिताभ बच्चन यांच्याकडे स्ट्रगल अॅक्टर म्हणून बघितले जात होते. कारण इंडस्ट्रीमध्ये त्यांचे एकापाठोपाठ तब्बल नऊ चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले होते. रमेश सिप्पी यांचा ‘शान’ बॉक्स आॅफिसवर सपशेल अपयशी ठरला तेव्हा तर अमिताभ यांच्या करिअरवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. अशात त्यांना राजकपूर यांच्या होळीचे निमंत्रण आले अन् जणू काही त्यांच्या बॉलिवूड करिअरच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.
अमिताभ होळीसाठी आर. के. स्टूडिओमध्ये पोहचले होते तेव्हा त्या ठिकाणी बॉलिवूडमधील अनेक धुरंधर होते. त्यामुळे अमिताभ लाजत त्यापेक्षा घाबरत एका कोप-यात जाऊन उभे राहिले. काही वेळानंतर राजकपूर त्यांच्याजवळ आले. त्यांनी हळूच अमिताभ यांना ‘...चल आज काही तरी धमाल करूया! बघ किती लोक आले आहेत, या सगळ्यांना तुझ्यातील प्रतिभा बघायची आहे. काय माहीत की, यामुळे तुझ्या करिअरला कलाटणी मिळेल?’ असे म्हटले. हे ऐकताच अमिताभमध्ये जणू काही नवा उत्साह संचारला. त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या आवाजात ‘रंग बरसे भीगे चुनर वाली’ हे गाणे गायिले. वडील हरिवंशराय बच्चन यांनी रचलेल्या या गाण्याला अमिताभने एवढ्या मनापासून गायिले की, संपूर्ण स्टूडिओमध्ये माहोल निर्माण झाला.
हे गाणे पार्टीत उपस्थित असलेल्या दिग्दर्शक यश चोपडा यांना एवढे पसंत आले की, त्यांनी अमिताभ यांना त्यांच्या आगामी ‘सिलसिला’ या सिनेमासाठी साइन केलेच शिवाय त्यांच्याच आवाजातील हे गाणे सिनेमात दाखविले. हा सिनेमा १९८१ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा सिनेमा हिट ठरला शिवाय ‘रंग बरसे भीगे चुनर वाली’ हे गाणे लोकांना एवढे पसंत आले की, आजही होळीच्या सणात या गाण्याची धुंद अनेकांवर चढते. राजस्थानी लोकसंगीताशी निगडीत असलेले हे गाणे हरिवंशराय बच्चन यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडले आणि त्यास त्यांचाच मुलगा अमिताभने योग्य न्याय देत त्याला अजरामर केले.