राज कपूर यांना उगाच ‘शो मॅन’ म्हटले जात नाही. त्यांचे प्रत्येक काम शानदार होते. त्यांच्या चित्रपटांइतक्याच त्यांच्या घरी रंगणा-या पार्ट्याही शानदार असत. राज कपूर यांच्या आर. के. स्टुडिओमधील होळी तर आजही आठवली जाते. दिलीप कुमार, मनोज कुमार, शम्मी कपूर, शशी कपूर, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, जितेन्द्र, धर्मेन्द्र, हेमा मालिनी असे सगळे बॉलिवूड दिग्गज या पार्टीत धम्माल मस्ती करायचे. राज कपूर यांनी फिल्मी स्टार्सच्या होळी सेलिब्रेशनची परंपरा सुरु केली, असे म्हणता येईल. कारण त्याआधी बॉलिवूडमध्ये होळीचे अशाप्रकारचे कुठलेही भव्य सेलिब्रेशन होत नव्हते. दरवर्षी होळीला आर. के. स्टुडिओमध्ये अशी काही होळी पार्टी रंगायची की, वर्षभर बॉलिवूडचे कलाकार या पार्टीची प्रतीक्षा करायचे.
नाच-गाणे, वेगवेगळ्या प्रकारची पक्वाने आणि रंगाने भरलेला हौद अशी सगळी जय्यत तयारी असायची.आर.के स्टुडिओत होळी सेलिबेट करण्यासाठी एका मोठ्या हौदेत भरपूर पाणी आणि त्यात रंग मिसळले जायचे. येथे येणा-या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत रंगाने भरलेल्या हौदेत डुबकी मारुन केले जायचे. जे हौदेत डुबकी मारण्यास नकार द्यायचे त्यांना बळजबरीने रंगवले जायचे. त्यानंतर सर्वजण ताल धरुन या रंगांच्या उत्सवाची मजा लुटायचे.1988 पर्यंत आर.के. स्टुडिओमध्ये दरवर्षी होळी पार्टी रंगायचह. पण राज कपूर यांच्या निधनानंतर होळी पार्टी बंद झाली. राज कपूर यांच्या भावांनी वा मुलांनी ही पार्टी सुरु ठेवण्यात फार रस दाखवला नाही.