भारतीय रॅपर हनी सिंह (Honey Singh) ची 'यो यो हनी सिंह' डॉक्युमेंटरी नुकतीच प्रदर्शित झाली आहे. यामध्ये त्याने वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. हनी सिंहचं नाव अनेक वादात अडकलं होतं. विशिष्ट आजार, बायपोलर पर्सनॅलिटी, पत्नीसोबत वाद यामुळे तो सतत चर्चेत राहिला. तसंच काही वर्षांपूर्वी शाहरुखने (Shahrukh Khan) हनी सिंहला कानाखाली मारल्याची बातमी पसरली होती. आता इतक्या वर्षींनी हनी सिंहने त्यावर मौन सोडलं आहे.
हनी सिंहने शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्सप्रेस' मध्ये 'लुंगी डान्स' हे गाणं गायलं होतं जे प्रचंड गाजलं. तेव्हा हनी सिंह आणि शाहरुख खान यांनी एकत्र यूएस टूर केली होती. याच टूरवेळी शाहरुखने हनी सिंहला कानाखाली मारल्याची बातमी पसरली. यावर हनी सिंह डॉक्युमेंटरीमध्ये म्हणतो, "९ वर्षांनंतर आता मी सांगतो की तेव्हा नक्की काय झालं होतं. मी आता काय सांगणार आहे हे आजपर्यंत कोणालाच माहित नाही. कोणीतरी शाहरुखने मला कानाखाली मारल्याची अफवा पसरवली होती. अरे शाहरुखचं माझ्यावर प्रेम आहे तो कधीच माझ्यावर हात उचलणार नाही. जेव्हा आम्ही शिकागोला शोसाठी गेलो होतो तेव्हा मी म्हटलं, 'मला परफॉर्म करायचं नाही'. कारण मी स्टेजवर मरणार अशी मला खात्री होती. प्रत्येक जण मला तयार हो आणि स्टेजवर ये असं सांगत होता. मी नाही नाहीच म्हणत होतो. मी वॉशरुममध्ये गेलो आणि डोक्यावरचे सगळे केसच कापले. बाहेर येऊन म्हणालो, 'आता कसं करु मी परफॉर्म?' यावर मॅनेजर म्हणाला, 'टोपी घाल आणि कर'. मग मी समोर असलेला कॉफी मगच डोक्यावर आपटला. याच कारणाने माझ्या डोक्याला दुखापत झाली होती."
याच डॉक्युमेंटरीमध्ये याविषयी हनी सिंहची बहीण सांगते, "मी तेव्हा माझ्या खोलीत होते. हनीने मला मेसेज केला की तो संकटात आहे. त्याने मला स्काईप कॉल केला. त्यावर तो म्हणाला, 'मला वाचव गुडिया, प्लीज वाचव'. असं म्हणत त्याने फोन कट केला. मी त्याच्या एक्स पत्नीसी संपर्क साधला. ती म्हणाली,'हनीला हा शो करावाच लागेल. त्याची समजूत घाल'. मी म्हणाले, 'मी नाही करु शकत. त्याने मला त्याच्यासोबत काही वाईट होतंय असं सांगितलं.' पुढचे तीन तास त्याच्याशी संपर्क झाला नाही. नंतर तो रुग्णालयात दाखल झाल्याचा मला फोन आला आणि त्याच्यावर डोक्याला टाके पडल्याचं कळलं."