ठळक मुद्देआपल्या या पोस्टसोबत उशोशीने कोलकाता पोलिसांसह मीडिया चॅनल्स आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टॅग केले.
माजी मिस इंडिया उशोशी सेनगुप्ता हिच्यासोबत जे काही झाले, ते वाचून तुम्हालाही राग अनावर होईल. उशोशीने एक भलीमोठी पोस्ट लिहून आपबीती सांगितली आहे.ही घटना सोमवार मध्यरात्रीची आहे. उशोशी काम संपवून कोलकात्यातील एका हॉटेलातून आपल्या घरी परतत असताना तिला या घटनेला सामोरे जावे लागले. घरी जाण्यासाठी तिने उबर कॅब बुक केली. यानंतर तिच्यासोबत जे काही घडले ते हृदयद्रावक आहे.
उशोशीने फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, सोमवारी रात्री ११.४० च्या सुमारास उशोशी जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमधून काम संपवून घरी जायला निघाली. तिच्यासोबत तिचा सहकारीही होता. दोघांनी उबर कॅब बुक केली. ते दोघेही अर्ध्या रस्त्यावर पोहोचले असताना काही टपोरी मुलांची टोळी बाइकवरून त्यांच्या गाडीच्या जवळ आली. त्यांनी बाइकने उबर गाडीला धडक दिली आणि यानंतर गाडीच्या ड्रायव्हरला बाहेर काढून बेदम मारहाण सुरु केली.
उशोशीने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, हे सगळे घडत असताना मला एका एक पोलीस अधिकारी तिथे दिसला. मी त्याला त्या मुलांना थांबवण्याची विनंती केली. पण त्या पोलीस अधिकाऱ्याने तो परिसर भवानीपुर पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येत असल्याचे सांगून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मी सतत विनंती केल्यानंतर त्या पोलीस अधिका-याने काही मुलांना पकडले. पण मुलांनी त्या पोलिसाला धक्का देत तिथून पळ काढला. यानंतर भवानीपुर पोलीस ठाण्यातून दोन अधिकारी आले. तोवर १२ वाजले होते. त्यानंतर मी ड्रायव्हरला मला आणि माझ्या सहकलाकाराला घरी सोडण्यास सांगितले आणि सकाळी पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला.’
आपल्या या पोस्टसोबत उशोशीने कोलकाता पोलिसांसह मीडिया चॅनल्स आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टॅग केले. दरम्यान कोलकाता पोलिसांनीही हे प्रकरण आम्ही गंभीरपणे घेतले असून आत्तापर्यंत सात लोकांना अटक केल्याचे सांगितले.उशोशीने २०१० मध्ये मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब जिंकला होता.