देशभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडले आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास साडेतीन महिन्यांपासून थिएटर व नाट्यगृह बंद आहेत. त्यात ते लवकर सुरू होण्याचीही चिन्हे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत काही सिनेमे डिजिटल माध्यमांवर प्रदर्शित होत आहेत आणि अनेक मोठे चित्रपट निर्मातेही चित्रपटाच्या रिलीजसाठी डिजिटलचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. त्यात आज हॉटस्टारच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज हॉटस्टार लाइव्हच्या माध्यमातून मोठी घोषणा करणार आहे. आज संध्याकाळी 4.30 वाजता या लाइव्हला अक्षय कुमार, अजय देवगण, आलिया भट, अभिषेक बच्चन, वरुण धवन हे कलाकारही पहायला मिळणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील काही सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले. त्यात जूनमध्येदेखील काही हिंदी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर होते. त्यामुळे हे चित्रपट डिजिटल माध्यमात रिलीज करणार की थिएटरमध्ये हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यात जवळपास साडेतीन महिन्यांपासून थिएटर बंद आहेत आणि ते इतक्यात सुरू होण्याचीही शक्यता नसल्याने अनेक मोठे चित्रपट निर्माते चित्रपट डिजिटल प्रदर्शित करण्याचा मार्ग निवडत आहेत. त्यात सूत्रांच्या माहितीनुसार, हॉटस्टारसोबत सातशे कोटींचा करार झाला असून बॉलिवूडमधील आगामी चित्रपट या माध्यमावर प्रदर्शित केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
'हॉटस्टार' आज करणार मोठी घोषणा, अक्षय कुमार, आलिया भट समवेत बॉलिवूडकर वळले डिजिटल माध्यमांकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 12:39 PM