हाऊसफुल ४ व मरजावां चित्रपटाचा साउंड टेक्निशियन निमिश पिळनकरचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला आहे. निमिशचं हाय ब्लड प्रेशरमुळे ब्रेन हॅमरेज झाल्यानं निधन झालं.
मागच्या काही दिवसांपासून तो एका वेब सीरिजसाठी काम करत होता. असं सांगितलं जातंय की गेले काही दिवस तो दिवसरात्र काम पूर्ण करण्यात व्यग्र होता. अतिकामाच्या ताणामुळे त्याची तब्येत अचानक बिघडली आणि मेंदूच्या नसा तुटल्याने त्याचा मृत्यू झाला. निमेशने नुकत्याच रिलीज झालेल्या बायपास रोड या वेबसीरिजसाठी सुद्धा काम केलं होतं.
निमिशच्या निधनाचे वृत्त समोर येताच प्रसिद्ध सिने दिग्दर्शक आणि पत्रकार खालिद मोहम्मद यांनी निमेशच्या मृत्यूबद्दल ट्वीट केलं. सुत्रांच्या माहितीनुसार निमेशवर कामाचा प्रचंड ताण होता आणि कामाच्या या ताणामुळेच त्याचा ब्लड प्रेशर वाढला आणि ब्रेन हॅमरेज झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. निमेश अवघ्या २९ वर्षांचा होता. खालिदनं त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'साउंड टेक्निशिनयन निमेश पिळनकरचा वयाच्या २९व्या वर्षी मृत्यू. हे टेक्निशिनयनच चित्रपटाचा कणा असतात. मात्र त्यांची पर्वा कोणालाच नसते. सर्व संघटना स्टार्स आणि निर्मात्यांनी आता झोपेतून उठण्याची हीच वेळ आहे.'