शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या यशाच्या शिखरावर आहे. २०२३ हे वर्ष त्याच्यासाठी खूप खास होतं. आता तो आगामी सिनेमांच्या तयारीला लागला आहे. दरम्यान मधल्या ४ वर्षांच्या काळात शाहरुख स्क्रीनवरुन गायब होता. त्याआधीचे त्याचे काही सिनेमे दणाणून आपटले होते. तसंच वैयक्तिक आयुष्यातही बरंच काही घडलं होतं. आता नुकतंच शाहरुखने अपयशाला कसं सामोरा जातो यावर भाष्य केलं आहे.
दुबईमध्ये झालेल्या ग्लोबल फ्रेट समिटमध्ये शाहरुख खानने खुलासा केला आहे. अपयशावर बोलताना तो म्हणाला, "अपयश आलं की मला खूप वाईट वाटतं. मी बाथरुममध्ये जाऊन खूप रडतो. पण मी हे कोणालाच दाखवत नाही. काही काळ तुम्ही स्वत:वर दया दाखवू शकता पण नंतर तुम्हाला हे मान्य करावंच लागतं की जग तुमच्या विरोधात नाही. तुमचा सिनेमा तुमच्यामुळे किंवा संपूर्ण जग तुमच्या नुकसानाची प्रार्थना करत असेल यामुळे आपटलेला नाही. तर हा सिनेमा वाईटच बनला म्हणून चालला नाही हेच सत्य मानून पुढे जाणं चांगलं असतं."
तो पुढे म्हणाला,"आयुष्यात निराशा येत राहते पण असेही क्षण असतात जे सांगतात की नाही, उठ आणि पुढे चालत राहा. तुम्हाला पुढे जावंच लागेल कारण जग तुमच्याविरोधात नाही. केवळ तुमच्याचबाबतीत गोष्टी चुकीच्या होत आहेत असं समजू नका. आयुष्य पुढे जात राहतं. तुम्ही आयुष्याला दोष देऊन उपयोग नाही. बिझनेस, मार्केटिंग, प्लॅनिंग कदाचित चुकलं असेल हे मान्य करा. हे समजून मग पुन्हा तयारी करा आणि या."