नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. आपलं सौंदर्य, अदा, नृत्य आणि अभिनयानं या मराठमोळ्या मुलीनं हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. 'टक्कर', 'दिलजले', 'सपूत', 'तराजू', 'सरफरोश' अशा विविध सिनेमात सोनाली बेंद्रे हिने साकारलेल्या भूमिकांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. सोनाली तिच्या संसारात बिझी आहे. निर्माता गोल्डी बहेलसह लग्नबंधनात अडकलेली सोनाली एका मुलाची आई आहे.
मुंबईत जुहू या पॉश परिसरात सोनाली आणि गोल्डी बहेल यांचे आलिशान आणि शानदार घर आहे. या घराची एक खास बात आहे.ही विशेष बाब म्हणजे या घराचे इंटेरिअर हृतिक रोशनची एक्स वाइफ आणि प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर सुझान खान हिने केले आहे. सुझान आणि सोनाली या जुन्या मैत्रिणी आहेत. याशिवाय सोनालीने तिच्या घरात अबु जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेले डेकोरेशन आयटम्स ठेवले आहेत.
एक उत्तम अभिनेत्री असलेल्या सोनालीच्या जीवनाचा आणखी एक पैलू काही दिवसांपूर्वी समोर आला होता. अभिनेत्रीसह ती एक लेखिकाही आहे. सोनाली बेंद्रेने ‘पालकत्व’ या विषयावर एका उत्तम, दर्जेदार पुस्तकाचे लिखाण केले आहे. शिवाय सोनालीला वाचनाची आवड आहे. त्यामुळे घरात तिने खास बुक शेल्फ तयार करुन घेतले आहे. सोनालीने तिच्या घराचे अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये ती घरात निवांत क्षण घालवताना पाहायला मिळत आहे.
सोनाली बेंद्रेने कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात केली. तिला कॅन्सरचे निदान झाल्यानंतर ट्रीटमेंट घेण्यासाठी ती अमेरिकेला गेली होती. जवळपास वर्षभर ट्रीटमेंट घेतल्यानंतर ती कर्करोगमुक्त झाली आणि काही महिन्यांपूर्वीच ती भारतात परतली आहे.
या ट्रीटमेंट दरम्यान तिला अनेक चढउतारांचा सामना करावा लागला.तरीदेखील ती नेहमीच सकारात्मक राहिली आणि आपला अनुभव सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी शेअर करत असते. तिचे अनुभव सकारात्मक ऊर्जा देणारे असतात त्यातून इतरांनाही प्रेरणा मिळते.