'बेबी जॉन' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. वरुण धवनची सिनेमात प्रमुख भूमिका आहे. सिनेमाच्या टीझर, ट्रेलरपासूनच हा सिनेमा प्रेक्षकांच्या वॉचलिस्टवर आहे. 'बेबी जॉन'मध्ये जॅकी श्रॉफ खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर जेव्हा रिलीज झाला तेव्हा सर्वांना सरप्राइज मिळालं ते म्हणजे ट्रेलरच्या शेवटी झालेली सलमान खानची एन्ट्री. आता सलमान 'बेबी जॉन'मध्ये किती मिनिटांसाठी दिसणार, याबाबत स्वतः वरुण धवनने खुलासा केलाय.
'बेबी जॉन'मध्ये सलमानचा कॅमिओ किती मिनिटांचा?
'बेबी जॉन'मध्ये सलमान खानचा कॅमिओ आहे यावर आता शिक्कामोर्तब झालाय. पण सलमान किती वेळासाठी दिसणार हे मात्र कोणाला माहित नव्हतं. अखेर याबाबत स्वतः 'बेबी जॉन' फेम वरुण धवननेच खुलासा केलाय. वरुण म्हणाला की, "सलमानचा सिनेमात पाच-सहा मिनिटांचा सीन असेल. सलमान यांच्यावर संपूर्ण देश खूप प्रेम करतो. मला खात्री आहे की सलमानचा सीन पुढे अनेक दिवस सर्वांच्या मनात राहिल. या सीनमध्ये ड्रामा, कॉमेडी आणि अॅक्शनचा तडका आहे."
बेबी जॉन कधी रिलीज होणार?
'बेबी जॉन' सिनेमात अभिनेता वरुण धवनचा कधीही न पाहिलेला रॉकिंग अंदाज ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. २५ डिसेंबर २०२४ ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात वरुणसोबत वामिका गाबी, किर्ती सुरेश, जॅकी श्रॉफ यांची प्रमुख भूमिका आहे. आता सलमान सिनेमात विशेष भूमिकेत असल्याने थिएटरमध्ये प्रेक्षकांचा कल्ला होणार, यात शंका नाही.