सोनाली कुलकर्णी हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. तिने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्येदेखील तिने आपले प्रस्थ निर्माण केले आहे. मिशन काश्मीर, दिल चाहता है यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दिल चाहता है हा चित्रपट सोनालीच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. हा चित्रपट सोनालीला कसा मिळाला हे तिने नुकतेच फेमसली फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे.
दिल चाहता है या चित्रपटात सोनालीची निवड कशी झाली याविषयी ती सांगते, "ती एक गंमतच आहे. कोणीतरी माझे फोटो पाठवले होते आणि झोयाने ते पाहिले. ती 'दिल चाहता है'साठी कास्टिंग करत होती. तिला माझे फोटो आवडले आणि मला या चित्रपटासाठी विचारावे, असे तिने ठरवले आणि तिने मला या चित्रपटासाठी लूक टेस्टसाठी बोलावले. मी देखील लगेचच यासाठी तयार झाले. मी त्या आधी मिशन काश्मिर आणि प्यार तुने क्या किया हे सिनेमे केले होते. तिने मला पहिला सीन करायला सांगितला... तिने या सीनबद्दल सांगितले होते की, कल्पना कर की, तू कोणाकडे तरी पहिल्यांदाच गेली आहेस आणि घरात सगळा पसारा पडला आहे." यावर आम्ही खूप हसलो. नंतर मी एक्सेलच्या ऑफिसमध्ये जाऊन या भूमिकेसाठी ऑडिशन दिले. तिथून मी अगदी आनंदात परत आले होते. झोया मला फारच आवडली होती. आताही मला वाटतं की झोया, फरहान आणि रितेशमध्ये या माध्यमासाठीचं प्रचंड प्रेम आहे"
सोनाली पुढे असंही म्हणाली की, झोयाच्या दिग्दर्शनाखाली पुन्हा एकदा काम करण्याची तिची तीव्र इच्छा आहे.
आमिर खान, सैफ अली खान, अक्षय खन्ना, डिम्पल कपाडिया, प्रीती झिंटा यांच्या दिल चाहता है या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा, यातील प्रत्येक कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. या चित्रपटातील सगळीच गाणी हिट झाली होती.