‘ग्रीक गॉड’ नावाने लोकप्रिय असलेला अभिनेता हृतिक रोशन लवकरच ‘फायटर’या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात हृतिकच्या अपोझिट दीपिका पादुकोण दिसणार आहे. पण आज हृतिकच्या सिनेमाबद्दल नाही तर त्याच्या अलिशान घराबद्दल सांगणार आहोत. होय, हृतिकचे हे अलिशान घर मुंबईतील जुहू भागात आहे.हे घर हृतिकच्या क्लासिक पसंतीचा एक नमूना आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कारण या घराचा प्रत्येक कोपरा हृतिकच्या पसंतीनुसार डिझाईन करण्यात आला आहे. हृतिकला ग्रीसचे शहर सँटोरिनी खूप आवडते. हे शहर पांढ-या व निळ्या आर्टिटेक्चरसाठी प्रसिद्ध आहे. हेच ध्यानात ठेवून हृतिकच्या घरात पांढ-या व निळ्या रंगांचा वापर करण्यात आला आहे.
3000 स्क्वेअर फुट भागात पसरलेल्या या घरात हृतिकचे सुंदर ऑफिसही आहे. घरातल्या भींतीवरच्या युनिक पेन्टिंग्स आणि लाकडाच्या शोभेच्या वस्तूही खास आहेत. या भींतींवरचे मोटिवेशनल कोट्सही लक्षवेधी आहेत.हृतिकच्या घरात एक पियानोही आहे. यावर तीन मास्क आहेत. हे आर्टवर्क हृतिकची दोन्ही मुले रिहान व रिदान यांनी बनवले आहेत.
हृतिकने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एंट्री केली आणि आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिदीर्ला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते.
पहिल्याच चित्रपटासाठी हृतिकला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. कहो ना प्यार है हा हृतिकचा पहिला चित्रपट नव्हता. त्याने लहानपणी एका चित्रपटात काम केले होते.1986 साली प्रदर्शित झालेल्या ‘भगवान दादा’ या चित्रपटात राकेश रोशन, श्रीदेवी आणि रजनीकांत यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात हृतिकने रजनीकांत यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. त्यावेळी हृतिक केवळ 12 वर्षांचा होता.