Join us

‘सुपर 30’ हृतिक रोशनने चाहतीला गिफ्ट केली लिपस्टिक; पण का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 14:27 IST

होय, अलीकडे हृतिकने या चाहतीला एक नाही तर तीन-तीन लिपस्टिक गिफ्ट केल्यात. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे.

हृतिक रोशनवर जीव ओवाळून टाकणारे असंख्य चाहते आहेत. हृतिकच्या अशाच एका चाहतीबद्दलची बातमी आहे. होय, अलीकडे हृतिकने या चाहतीला एक नाही तर तीन-तीन लिपस्टिक गिफ्ट केल्यात. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. हृतिकचे गिफ्ट म्हटल्यावर चाहतीचाही आनंद गगनात मावेनासा झाला. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आपला आनंद शेअर केला. आता हृतिकने या चाहतीला लिपस्टिकचं का गिफ्ट करावेत, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्यामागेही एक खास कारण आहे. होय, या चाहतीचे नाव अनामिका आहे. पाटण्यात राहणाऱ्या अनामिकाने हृतिकच्या ‘सुपर 30’ लूकची एक पेन्टिंग बनवली आहे. ती सुद्धा लिपस्टिकने. 

ही पेन्टिंग पाहून हृतिक इतका खूश झाला की, त्याने अनामिकाला तीन शेड्सच्या लिपस्टिक गिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. शिवाय अनामिकाने बनवलेल्या पोस्टरसाठी तिचे खास आभारही मानलेत.  या पोस्टरसाठी आभार. तुझ्यासाठी एक सरप्राईज पाठवतो आहे. माझी भेट तुला आवडेल, अशी आशा करतो, असे हृतिकने लिहिले. यानंतर हृतिकची भेट अनामिकाच्या घरी पोहोचली आणि खुद्द हृतिकने आपल्यासाठी भेट पाठवली, या आनंदाने अनामिका जणू बेभान झाली. तू पाठवलेली भेट खूप आवडली. खरेच सांगते, हे एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे, असे तिने म्हटले.

तुम्हाला ठाऊक आहेच की, हृतिकचा ‘सुपर 30’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ऋतिक रोशनचा ‘सुपर 30’ हा चित्रपट आनंद कुमार यांचा बायोपिक म्हणून तयार करण्यात येणार होता.  मात्र आता तो बायोपिक म्हणून नाही तर एक प्रेरणादायी कथेच्या स्वरुपात तयार करण्यात येणार आहे. आनंद कुमार बिहारात ‘सुपर30’ नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. दरवर्षी भारतभर फिरून  निवडक ३० विद्यार्थी निवडून हे आनंद कुमार पाटण्याला त्यांच्या घरी आणतात. त्यांचा राहण्या खाण्यापासून ते कोचिंग आणि नंतर प्रवेश परीक्षा असा सर्व खर्च आनंद स्वत: करतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी भाऊ आणि आई मदत करतात.  

टॅग्स :हृतिक रोशन