गेल्या वर्षी दिवाळीत 'टायगर 3' रिलीज झाला. 'टायगर 3' संपल्यावर सर्वांना हृतिक रोशनची झलक दिसली. हृतिक पुन्हा एकदा कबीरच्या भूमिकेत 'वॉर 2' मध्ये भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाचं शुटींग सुरु आहे. अशातच 'वॉर 2' च्या सेटवरील हृतिकचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. रक्तबंबाळ चेहरा असलेला हृतिकचा अवतार बघून नेटकऱ्यांची उत्सुकता शिगेला आहे.
'वॉर 2'च्या सेटवरून हृतिकचा फोटो समोर आला होता. 'झूम टीव्ही'ने हृतिकचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हृतिक काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याचा टी-शर्ट थोडा फाटलेला आहे. चेहऱ्यावर जखमांच्या खुणा आहेत. त्याची दाढी आणि डोक्यावरील काही केस पांढरे दिसत आहेत. हृतिकचा लूक पाहून लोकही अंदाज लावत आहेत की हे ॲक्शन सीनच्या शूटिंगपूर्वीचे फोटो आहेत की नंतरचे.
हृतिक सध्या चित्रपटाच्या ॲक्शन भागाचे शूटिंग करत आहे. या फोटोंमध्ये हृतिक एका व्यक्तीशी बोलत आहे. पण त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. मात्र तो दिग्दर्शक अयान मुखर्जी असल्याचं समजतंय. 'वॉर 2' मध्ये हृतिकसोबत ज्यु. एनटीआर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा याचवर्षी नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.