मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha ) हा सिनेमा गेल्या गुरूवारी प्रदर्शित झाला. पण रिलीजआधी या चित्रपटाला विरोध सुरू झाला होता. होय, एकीकडे सिनेमाच्या रिलीजची तारीख जवळ येत होती, दुसरीकडे सोशल मीडियावर BoycottLalSinghchaddha ट्रेंड होत होता. जाणकारांचे मानाल तर, या ट्रेंडमुळे ‘लाल सिंग चड्ढा’च्या कमाईवर नकारात्मक परिणाम झाला. खरं तर समीक्षक व बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी ‘लाल सिंग चड्ढा’चं भरभरून कौतुक केलं. पण तरिही प्रेक्षकांनी हा सिनेमा नाकारला. यासाठी BoycottLalSinghchaddha हा ट्रेंड कारणीभूत असल्याचं अनेक जाणकारांचं मत पडलं आहे.
आता काय तर, आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’चं समर्थन वा कौतुक करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींनाही भोगावं लागतंय. होय, हृतिक रोशनने (Hrithik Roshan) ‘लाल सिंग चड्ढा’चं कौतुक करणारी पोस्ट केली आणि त्याला ही पोस्ट जाम महागात पडली. त्याच्या या पोस्टनंतर काहीच वेळात #BoycottVikramVedha ट्रेंड होऊ लागला.
‘आत्ताच मी लाल सिंग चड्ढा हा चित्रपट पाहिला आणि जणू मी या चित्रपटाचं हृदय अनुभवलं. या हृदयाचा एक एक ठोका अनुभवता येऊ शकतो. हा सिनेमा खरंच शानदार आहे. कुणीही हा उत्तम सिनेमा मिस करू नये. जा, आणि जाऊन बघा... हा सिनेमा बघा आणि त्याचं सौंदर्य अनुभवा..., अशी पोस्ट हृतिकने शेअर केली.
हृतिकच्या ट्विटनंतर काही वेळातच ट्विटरवर ‘बॉयकॉट विक्रम वेधा’ हा ट्रेंड पाहायला मिळाला. हृतिकने आमीरच्या चित्रपटाचं इतकं तोंडभरुन केलेलं कौतुक लोकांना रूचलं नाही. यानंतर अनेकांनी हृतिकला ट्रोल करायला सुरूवात केली. तू कश्मीर फाइल्सचा सपोर्ट का केला नाहीस? असा खोचक सवाल एका युजरने हृतिकला केला. तुझा नवा सिनेमा कोणता येतोय, तो सुद्धा बायकॉट करू, असा इशारा अनेकांनी त्याला दिला.
हृतिकचा ‘विक्रम वेधा’ हा सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हा ‘विक्रम वेधा’ या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. मूळ तामीळ चित्रपटात माधवन आणि विजय सेतुपती हे दोन सुपरस्टार मुख्य भूमिकेत होते. याच चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान लीड रोलमध्ये दिसणार आहेत.